धर्म ही खरेतर प्रत्येकाची अत्यंत व्यक्तिगत अशी बाब आहे, प्रत्येकाला जसे आपल्या धर्मश्रद्धा जपण्याचे स्वातंत्र्य आहे, तसेच धर्मात सांगितलेल्या कोणत्या गोष्टींचे पालन करायचे किंवा नाही हा देखील ज्याच्या त्याच्या व्यक्तिगत विवेकाचा भाग आहे. प्रत्येक धर्मात सांगितलेल्या सर्वच तत्वांचे पालन जर सर्वांनीच केले असते तर आज समाजात अस्वस्थता आणि अराजकता शिल्लकच उरली नसती, पण तसे होत नसते. पण म्हणून एखाद्यावर धर्मातील एखाद्या गोष्टीची सक्ती करणे आणि त्यासाठी त्याला ट्रोल करणे हे कोणत्याच धर्माचे तत्वज्ञान असूच शकत नाही. आज शमी ला ट्रोल करणाऱ्यांनी आणि त्यासोबतच प्रत्येक धर्मातील स्वयंघोषित तत्त्वज्ञांनी याची जाणीव ठेवणे आवश्यक आहे.
सध्या इस्लाम धर्मातील पवित्र मानला जाणारा रमजान महिना सुरु आहे. या महिन्यात इस्लाम धर्मीय लोक रोजे पकडतात. इस्लाममध्ये रोजाला अनन्यसाधारण महत्व आहे, किंबहुना इस्लामच्या प्रमुख आचरण तत्वांचा तो एक महत्वाचा भाग आहे. रमजान महिन्यात रोजे केल्याने पुण्य पदरी पडते अशी धारणा आहे. त्यामुळेच इस्लाम धर्मश्रद्धा मानणारे व्यक्ती जमेल त्या पद्धतीने रोजे करतातच. हा झाला श्रद्धेचा भाग. यामध्ये धर्माने सांगितलेले तत्वज्ञान आपल्याला पटले आहे आणि पुण्य मिळवायचे आहे. 'कयामत' च्या दिवशी उत्तर द्यायचे आहे अशा अनेक भावना आहेतच. त्या भावनांना कोणाचा विरोध असण्याचे देखील काही कारण नाही. जसे इस्लाममध्ये रोजा महत्वाचा मानला जातो तसेच वेगवेगळ्या धर्मात वेगवेगळे श्रद्धा प्रकार, उपवास, अनुष्ठान असतातच. त्याभोवती देखील अशाच पुण्याच्या आणि आत्मशांतीच्या कल्पना, भावना असतात. पण म्हणून कोणावरही तुम्ही अमुक एका धर्माचे आहेत म्हणून तुम्ही तो उपवास किंवा अनुष्ठान केलेच पाहिजे अशी सक्ती मूळ धर्माला देखील अपेक्षित नाही. कोणत्याही धर्मामध्ये हे सारे विधी 'फर्ज' म्हणजे कर्तव्य म्हणून सांगितलेले असतात. त्याची सक्ती अपेक्षित नसते.
आज हे सारे सांगण्याचे कारण म्हणजे क्रिकेटपटू मोहंमद शमी . सध्या चॅम्पिअनस ट्रॉफी सुरु आहे, आणि यात भारताच्या बाजूने मोहंमद शमी या महत्वाचा खेळाडू आहे. भारतीय क्रिकेट संघाची ज्या काही मोजक्या खेळाडूंवर भिस्त आहे त्यापैकी मोहंमद शमी हा एक. तर त्या मोहंमद शमीचे एनर्जी ड्रिंक पितानाचे फोटो समोर आले आणि त्यामुळे मागच्या दोन दिवसांपासून मोहंमद शमी ट्रोल होत आहे. ज्यांची धार्मिकतेची जाण यथातथाच आहे किंवा ज्यांचे दिनी शिक्षण देखील फारसे झालेले नाही असे लोक देखील समाजमाध्यमांवर शमीला ट्रोल करीत त्याने रोजा न करून कशी घोडचूक केली आहे हे सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत. मुळातच रोजा असेल किंवा कोणत्याही धर्मतत्वचे पालन, हे प्रत्येकाचे व्यक्तिगत कर्तव्य आहे, त्याची त्याच्यावर सामूहिक सक्ती करता येत नसते आणि असे सक्तीने करून घेतलेले धर्माचरण 'कबूल' देखील होत नसते. धर्म कोणताही असो, त्यातील कोणत्याच गोष्टीची सक्ती अपेक्षित नाही. धर्माचरण हे प्रत्येकाच्या स्वतःच्या आत्मिक उन्नतीसाठीचे असते, त्यामुळे आपल्याला ते कोणत्या मर्यादेपर्यंत झेपते हे ठरविण्याचा अधिकार प्रत्येकाला धर्मानेच दिलेला आहे. कुराणमध्ये देखील रोजे ठेवण्यापासून सवलत देण्याचा उल्लेख आहे. ज्याला प्रकृतीच्या कारणामुळे, किंवा इतर काही गोष्टींमुळे रोजे ठेवणे शक्य नसते, त्याला तशी सवलत देण्याचा उल्लेख कुराणमध्ये आहे, मग रोजा सक्तीचाच असता तर कोणत्याच कारणाने कोणत्याच सवलतीचा विषयच आला नसता. पण तसे नसते. सक्तीने धर्माचरण करायला लावणे कोणत्याच धर्माला अपेक्षित नसते, अगदी इस्लामला सुद्धा. मात्र याची जाणीव आज शमीला ट्रोल करीत असलेल्या किती लोकांना आहे?
प्रश्न केवळ शमीला ट्रोल करणारांची किंवा कोणत्याही एका धर्मातील कट्टरतेच नाही, तर मागच्या काही काळात अनेक धर्मांमध्ये 'आम्ही म्हणतो तोच धर्म' असे म्हणणारी संख्या वाढत आहे. ही कट्टरता मूळ धार्मिक तत्वज्ञानात कोठेच नाही, मात्र आता तीच कट्टरता समाजात रुजविण्याचे काम सातत्याने होत आहे. त्यामुळेच अगदी धर्म म्हणजे काय हे न समजण्याच्या वयात व्यक्तीच्या डोक्यात धर्माची भीती आणि कट्टरता घालण्याचे काम काही लोक करीत आहेत. अशा लोकांना धर्माचे खरे तत्वज्ञान सांगण्यासाठी सर्वच धर्मातील धुरिणांनी, धर्मगुरूंनी समोर येणे आवश्यक आहे. धर्म सक्ती करण्याची नव्हे तर अंगिकारण्याची गोष्ट आहे हे ठासून सांगण्याची आवश्यकता आहे. आणि कोणालाही ट्रोल करून त्याच्या मनाला वेदना देणे हे देखील प्रत्येक धर्माच्या तत्वज्ञानात पापच मानले गेलेले आहे.