Advertisement

मुंबईत मराठी लोकांना नोकरी नाकारणं दुर्दैवी

प्रजापत्र | Monday, 06/05/2024
बातमी शेअर करा

 मुंबई- मुंबईतील गुजराती माणसाचा आत्मविश्वास हा सध्या वाढला आहे. कारण त्यांना माहिती आहे की, येथील राजकारणी आपल्या पाठिशी आहेत. याच आत्मविश्वासातून दक्षिण मुंबईत मराठी माणसांना नोकरी नाकारण्यात आल्याचा प्रकार घडला. ही घटना दुर्दैवी आहे, असे मत शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले. ते सोमवारी बारामतीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी सध्या मुंबईत सुरु असलेल्या मराठी विरुद्ध गुजराती  वादावर भाष्य केले. 

 

 

सध्या गुजराती नेत्यांचा आत्मविश्वास आणि अहंकार वाढला आहे. वरुन एक आदेश आला की, महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला जातात. त्यामुळे गुजराती नेत्यांचा अहंकार वाढला आहे. त्यामधूनच गुजराती कंपन्यांकडून मराठी माणसांना नोकरी नाकारण्याचे प्रकार घडत आहेत. हे असे होत असेल तर मराठी लोकांची ताकद दाखवून द्यावी लागेल, असे रोहित पवार यांनी म्हटले. मराठी संस्कृतीचा ध्वज दिमाखात मिरवणाऱ्या मुंबईच्या गिरगाव परिसरातील एका नोकरीसाठी देण्यात आलेल्या जाहिरातीवरुन सध्या सोशल मीडियावर वाद सुरु आहे. गिरगाव परिसरात असणाऱ्या या नोकरीसाठी 'मराठी उमेदवारांनी अर्ज करु नयेत', अशी खास सूचना जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आली होती. लिंक्डीन या व्यासपीठावरील या जाहिरातीचे स्क्रीनशॉटस् व्हायरल झाल्यानंतर मराठी भाषिकांमध्ये एकच संतापाची लाट उसळली होती.  

 

 

गदारोळानंतर कंपनीकडून पोस्ट डिलिट
रोजगारविषयक व्यासपीठ असलेल्या लिंक्डिनवर ही वादग्रस्त जाहिरात टाकण्यात आली होती. एचआर जान्हवी सराना या नावाने लिंक्डिनवर जाहिरात प्रसिद्ध झाली होती. त्यामध्ये मुंबईत ग्राफिक्स डिझाईनरच्या नोकरीसाठीचा तपशील देण्यात आला होता. विशेष म्हणजे मराठीबहुल वस्ती असलेल्या गिरगावातील एका कार्यालयात ही नोकरी होती. मात्र, उद्दामपणाचा कळस म्हणजे या जाहिरातीमध्ये मराठी लोकांनी नोकरीसाठी अर्ज करु नयेत, असे म्हटले होते. साहजिकच यावरुनच प्रचंड गदारोळ झाला. या सगळ्या प्रकारानंतर संबंधित कंपनीकडून ही पोस्ट डिलिट करण्यात आली होती. त्याचप्रमाणे एचआर जान्हवी सराना हिनेही माफी मागितली होती. 

 

 

ईशान्य मुंबईत गुजराती सोसायटीत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना प्रवेश नाकारला
गिरगावमधील घटना ताजी असतानाच ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील घाटकोपर पश्चिम परिसरात एका सोसायटीत गुजराती रहिवाशांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना प्रचार करण्यास मज्जाव केल्याचा प्रकार समोर आला. रविवारी संध्याकाळी हा प्रकार घडला. त्यानंतर ठाकरे गट आक्रमक झाला आहे. त्यामुळे आगामी काळात मुंबईत मराठी विरुद्ध गुजराती असा वाद रंगण्याची शक्यता आहे. 

 

Advertisement

Advertisement