Advertisement

संपादकीय अग्रलेख अराजक आणखी वेगळे काय असते ?

प्रजापत्र | Thursday, 26/11/2026
बातमी शेअर करा

पुण्यात न्यायालयाच्या बाहेर एका व्यक्तीवर दिवसाढवळ्या झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर आता पुन्हा एकदा महाराष्ट्रातील कायदासुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राज्याचे गृहखाते स्वतः मुख्यमंत्र्यांकडे आहे, मात्र राज्यातील कायदासुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या कोणत्याच विषयावर ते चौकशी समिती नेमण्यापलीकडे  किंवा चौकशीचे आदेश देण्यापलीकडे काही भाष्य करत नाहीत. पुण्यासारख्या शहरात दिवसाढवळ्या गोळीबार होतो, छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्र्याच्या घरावर हल्ला होतो, नागपूर काय किंवा मुंबई काय , गुन्हेगारांचे मनोबल प्रचंड वाढले आहे, पुण्यासारख्या शहराचे 'कोयता शहर' झाले आहे का असे वाटावे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे  मग अराजक यापेक्षा वेगळे काय असते ? स्वतःला इन्फ्रामॅन म्हणविणारे फडणवीस आता राज्याची कायदा सुव्यवस्था  बिहार, उत्तरप्रदेशला लाजवील अशी झाल्याबद्दल काय बोलणार आहेत ?

पुण्यात न्यायालयाच्या बाहेर एका तरुणावर दिवसाढवळ्या झालेल्या गोळीबाराच्या घटनेने महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती कशी आहे याचा आरसा दाखविला आहे.न्यायालयात आलेल्या तरुणावर गोळ्या झाडल्या जातात आणि वरतून पुन्हा कोयत्याने हल्ला केला जातो , ज्या पुण्यात 'कोयता गॅंग ' चा बंदोबस्त केल्याचे ढोल बडविले गेले होते, तेथे दिवसाढवळ्या हे घडते ,  पुण्यात ते होत असतानाच बीडमध्ये एका ग्राम महसूल अधिकाऱ्यावर वाळू माफिया हल्ला करत असल्याची घटना घडली. तसेही मागच्या दोन वर्षात महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या अनेक घटना घडल्या आहेत. बीड जिल्ह्यात २०२४ च्या डिसेंबरमध्ये घडलेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा राज्यभर गाजावाजा झाला , ती घटना नृशंसच , त्याचा निषेधच व्हायला हवा होता, तो झाला. मात्र त्या प्रकरणावरून बीड जिल्हा राज्यात बदनाम झाला, मात्र त्या अगोदर आणि त्यानंतरही राज्यभरात कायदा सुव्यवस्थेला हरताळ फासणाऱ्या अनेक घटना घडल्या त्याचे काय ?
२०२४ च्याच ऑक्टोबरमध्ये माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची मुंबईतील वांद्रे सारख्या गजबजलेल्या भागात दसऱ्याच्या दिवशी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.या हत्येची जबाबदारी बिश्नोई टोळीने घेतल्यानंतर मुंबई पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेच्या अपयशावर मोठी टीका झाली. पुण्यातील कल्याणीनगर भागात एका बड्या बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने भरधाव वेगाने पोर्श कार चालवून दोन तरुण आयटी अभियंत्यांना चिरडले, ज्यात दोघांचा मृत्यू झाला. सुरुवातीच्या तपासात पोलिसांनी गुन्ह्याचे गांभीर्य कमी केल्याचा, एफआयआरमध्ये त्रुटी ठेवल्याचा आणि ससून रुग्णालयातील डॉक्टरांशी संगनमत करून रक्ताचे नमुने बदलल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणात कर्तव्यात कसूर केल्याबद्दल दोन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले.मात्र पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह लागले ते लागलेच. बदलापूर येथील शाळेतील विद्यार्थिनींचे लैंगिक अत्याचाराचे प्रकरण आणि पुढे त्यातील आरोपी अक्षय शिंदेचा कोठडीतील मृत्यू  हे प्रकरण असेल किंवा आणखी इतर प्रकाराने, फडणवीसांचे पोलीस खाते कसे काम करत आहे आणि या खात्याचा धाक किती आहे हेच वारंवार समोर आले. २०२५-२५ या वर्षांत महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्याचे सरकारला विधानसभेत करावे लागले. त्याही पलीकडे जाऊन अगदी ताजे प्रकरण सांगायचे तर मंत्री संजय शिरसाट यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील निवासस्थानाबाहेर नशेतील तरुणांनी बाटल्या फोडून गोंधळ घातला. खुद्द मंत्र्यांनीच पोलीस आयुक्तांचा फोन बंद असल्याबद्दल आणि कायदा-सुव्यवस्थेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. एकीकडे हे होत असतानाच ऑक्टोबर २०२६ मध्ये मुंबई पोलिसांनी एका नागरिकाला बेकायदेशीररीत्या २६ दिवस कोठडीत ठेवल्याप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला ५ लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे आणि संबंधित पोलिसांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. बारामती आणि मुंबईत घडलेल्या गोळीबाराच्या घटना देखील भरपूर बोलक्या आहेत.राजकीय मतप्रवाह काहीही असतील तरी अजित पवारांच्या अपघाती निधनाबद्दलचे सामान्य जनता आणि राजकीय पदाधिकाऱ्यांच्या मनातले संशयाचे मळभ अजूनही दूर झालेले नाही. आ. रोहित पवारांच्या आरोपांकडे राजकीय म्हणून दुर्लक्ष करता येईल कदाचित पण अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार असलेले प्रकाश सोळंके असतील किंवा इतरही काही नेते , त्यांच्याही मनात या प्रकरणाबद्दल कोठेतरी संशय असेल तर त्याचे उत्तर काय ?
या झाल्या मोठाल्या घटना, ज्या राज्याच्या लक्षात आल्या , त्या पलीकडे जाऊन बीड काय , बारामती काय किंवा नागपूर, मुंबई आणि आणखी कोणताही जिल्हा किंवा गाव काय, गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्याप्रमाणावर वाढ झालेली आहे. दिवसाढवल्या गोळीबार, तलवारबाजी होते, सर्रास कोयते निघतात  याचे कोणालाच काहीच वाटत नाही. बेदरकारपणे  वाहन चालवून पादचाऱ्यांच्या जीवाशी खेळण्याची 'रेसिंग' ची क्रेझ अगदी माजलगावसारख्या  तालुक्याच्या ठिकाणापर्यंत पोहचते आणि त्यात दोन निष्पाप व्यक्तींचा जीव जातो, हे अपयश कायदा सुव्यवस्थेचे नाही का ? कोणतीही गंभीर घटना घडली आणि जनतेचा आक्रोश वाढला की एसआयटीची घोषणा करायची एक फॅशन मागच्या दोन वर्षात वाढली आहे. काही मोजक्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली अशी एसआयटी नेमली की मग सरकारचे काम संपले, अशा किती एसआयटी सध्या नेमलेल्या असतील याचा आकडा सरकारला देखील तोंडपाठ नसेल, त्या एसआयटींचे  पुढे काय झाले आणि किती प्रकारने यातून धसास लागली याचे उत्तर देण्याचे धारिष्ट्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या फडणवीसांनी करायला हवे. या साऱ्या घटना म्हणजे एकूणच या राज्यात पोलीस खाते काय करत आहे हे सांगायला पुरेशा आहेत. पुण्यासारख्या शहरात दिवसाढवळ्या गोळीबार होत असेल , मंत्र्यांच्या घरावर हल्ला करायला लोक जात असतील तर अराजक यापेक्षा वेगळे काय असते ?
 

Advertisement

Advertisement