बीड दि.७(प्रतिनिधी)-चकलांबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या ठाकरवाडी तांड्यावर एका १० वर्षीय मुलीचा मृतदेह शनिवारी (दि.७) सकाळी आढळून आल्याने खळबळ उडाली. मुलीचे वय लहान असल्यामुळे आणि नातेवाईक तथा वैद्यकीय अधिकाऱ्यांना आलेल्या वेगळ्या संशयामुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर पोलिसांची मोठी धावपळ उडाली. अप्पर पोलीस अधिक्षक यांच्यासह पोलीस उपाधीक्षक आणि चकलांबा पोलीस ठाण्याच्या प्रभारींनी दिवसभर तळ ठोकून मृतदेहाचे शवविच्छेदन छत्रपती संभाजीनगरच्या घाटीत इन कॅमेरा केल्यानंतर डॉक्टरांनी दिलेल्या अहवालानुसार त्या मुलीचा मृतदेह श्वास कोंडल्यामुळे झाल्याचे सांगितले. त्यामुळे वेगवेगळ्या चर्चाना शनिवारी रात्री ७ च्या सुमारास ब्रेक लागला.
चकलांबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या ठाकरवाडी तांड्यावर एका मुलीचा बेशुद्ध अवस्थेतील देह घराशेजारी आढळून आला. शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने हा देह पहिल्यानंतर तिच्या आजोबा आणि चुलत भावांना याची माहिती दिली. त्यानंतर आजोबा आणि भावांने तिला तात्काळ उपचारासाठी दाखल केले.मात्र तोपर्यंत तीचे प्राण गेले होते. घराशेजारी वाहणाऱ्या सांडपाण्यात तोंडावर पडल्याने तिचा जीव गेल्यामुळे खळबळ उडाली. डॉक्टरांनी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यापूर्वी संशय निर्माण केल्याने अप्पर पोलीस अधिक्षक समीर शेख यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी पोलीस उपाधीक्षक अनिल कटके आणि ठाण्याचे प्रभारी सचिन इंगळे हे देखील उपस्थितीत होते. दरम्यान परिस्थितीचे गांभीर्य पाहता सदर मुलीचे शवविच्छेदन छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयात करण्यात आले. दिवसभर पोलिसांनी तांड्यावर तळ ठोकून तपास सुरु केला होता. रात्री ७ च्या सुमारास मृतदेहाचे शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर सदर मुलीचा मृतदेह श्वास कोंडल्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाले. अप्पर पोलीस अधिक्षक समीर शेख यांनी देखील या घटनेबाबत बोलताना सदर मुलगी तोंडावर पडल्यामुळे आणि नाकात काही पाणी गेल्याने तिचा श्वास गुदमरला आणि या घटनेत तिचा मृत्यु झाल्याचे अहवालावरून स्पष्ट होतं असल्याचे प्रजापत्रला सांगितले.
आई-वडील कर्नाटकमध्ये
मयत मुलगी १० वर्षाची असून तिचे आई-वडील ऊस तोडण्यासाठी कारखान्याला गेले होते. ही मुलगी आपल्या आजोबाजवळ राहत होती. सकाळी तिचा मृतदेह आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली.आई-वडिलांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर दुःखाचा डोंगर घेऊन ते तांड्यावर दाखल झाले आणि यानंतर आक्रोशमुळे अनेकांचे डोळे पाणावले होते.

