Advertisement

संपादकीय अग्रलेख-युतीत कुस्ती ही कोणाची इच्छा ?

प्रजापत्र | Sunday, 01/11/2026
बातमी शेअर करा

एखाद्या निवडणुकीनंतर मित्र पक्षाने काम केले म्हणून काही पराभव स्वीकारावे लागले तर तत्कालीक प्रतिक्रिया उमटणे समजू शकत असते, मात्र महाराष्ट्रातील विधानपरिषद निवडणुकीनंतर भाजप आणि शिवसेनेमध्ये सध्या जे काही सुरु आहे, ते युतीतली कुस्ती म्हणूनच पाहिले जाईल. एकीकडे विरोधकांना कोलीत देऊ नका म्हणायचे आणि दुसरीकडे दोन्ही पक्षातील नेते , प्रवक्त्यांनी एकमेकांवर बोचरी टीका करायची हे न उमगणारे कोडे आहे. मुळात राज्यात भाजपचे नेते महायुतीच्या कितीही गप्पा मारत असले तरी एकनाथ शिंदेंचे राजकीय मोठेपण भाजपच्या राज्यातील नेत्यांना कधीच सहन झालेले नाही, मात्र शिंदे थेट 'मोटाभाई ' चा आशीर्वाद घेऊनच वावरत असल्याने स्थानिक भाजप नेत्यांचा नेहमीच नाईलाज झालेला आहे. त्यामुळे आता देखील युतीमधील ही कुस्ती आणि एकूणच कधी जरांगे यांच्या आडून तर कधी आणखी कोणत्या कारणाने एकनाथ शिंदेंवर होणारी टीका नेमकी कोणाला हवी आहे ?

 

राज्यातील विधानपरिषद निवडणुकीत पुणे पदवीधरमध्ये शिवसेनेच्या एका नेत्याने भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात भूमिका घेतली , अर्थात केवळ रवींद्र धंगेकर विरोधात गेले म्हणूनच भाजपचा पराभव झाला असे समजणे बाळबोध तरी होईल किंवा धंगेकरांचे महत्व फार मोठे आहे हे तरीमानावे लागेल. मात्र या पराभवानंतर भाजपकडून थेट शिवसेनेच्या नेत्यांना प्रश्न विचारण्यात आले. धंगेकरांवर तर टीका झालीच मात्र थेट शिवसेना नेतृत्वाने उत्तरे द्यावीत अशी अपेक्षा भाजपच्या प्रवक्त्यांनी जाहीरपणे व्यक्त केली. आता त्याला शिवसेनेकडून त्या प्रवक्त्यांचे वय काय असले काही सांगण्याचा प्रयत्न झाला, मात्र एखाद्या राष्ट्रीय पक्षाचे प्रवक्ते जेव्हा काही भूमिका मांडत असतात , त्यावेळी ती त्यांची व्यक्तिगत भूमिका नसते तर पक्षाची भूमिका असते आणि पक्षात काही तरी ठरल्यानंतरच अशी जाहीर वक्तव्ये येत असतात , हे शिवसेनेच्या नेत्यांना न समजण्याइतके नितेश राणे काय किंवा उदय सामंत आणि इतर नेते राजकीयदृष्ट्या अडाणी नक्कीच नाहीत. त्यामुळे भाजप प्रवक्ते असलेल्या नवनाथ बन यांनी केलेली टीका किंवा त्यांनी विचारलेले प्रश्न हे भाजपचेच प्रश्न आहेत असेच म्हणावे लागेल. तसे नसते तर जसे एकनाथ शिंदेंना रवींद्र धंगेकर यांना 'सबुरीचा सल्ला' द्यावा लागला तास भाजपच्या नेत्यांनीही प्रवक्त्यांना 'चार गोष्टी समजुतीच्या ' सांगितल्या असत्या. पण तसे काही झालेले ऐकिवात नाही, उलट भाजपच्या पत्रकारपरिषदा रोज सुरु आहेतच. यातूनच युतीमध्ये एकनाथ शिंदे आणि शिवसेनेबद्दल प्रश्न निर्माण व्हावेत ही इच्छा कोणाची आहे हे वेगळे सांगण्याची आववशक्ता नाही.

मुळात विधानपरिषदेचे निकाल हे एक निमित्त झाले, मागच्या पंधरा दिवसात राज्यातील राजकारणात जे काही घडले ते देखील विचार करायला लावणारे आहेच. मनोज जरांगे यांनी व्हायरल केलेली ऑडिओक्लिप , त्यात थेट श्रीकांत शिंदेंवर असलेले आरोप आणि त्या प्रकरणातही भाजपकडून शिवसेनेची ठोस पाठराखण करण्याऐवजी भाजपच्या नेत्यांनी शिवसेनेवरच केलेल्या टीका,हे सारे राज्यातले वारे वेगळ्याच दिशेने वाहत नाहीत ना असा प्रश्न विचारायला भाग पडणारे आहेत.

मुळात स्थानिक भाजपला एकनाथ शिंदे हे रसायनच अजूनही पुरते समजलेले नाही. ज्यावेळी शिवसेनेत फूट पाडून भाजपने सत्ता मिळविली, त्यावेळी एकनाथ शिंदेंना आपण सहज गुंडाळू असाच समाज देवेंद्र फडणवीसांसह राज्यातील भाजपचा होता. मात्र एकनाथ शिंदे कच्च्या गुरूचा चेला नाहीत, त्यांनी स्थानिक भाजप  नेत्यांना बाजूला करत स्वतःची भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडे एक हॉट लाईन निर्माण केली आणि आता तीच हॉटलाईन भाजपच्या फडणवीसांपासून सर्व नेत्यांची डोकेदुखी आहे.

 दुसरा मुद्दा म्हणजे अजित पवारानंतर आता महाराष्ट्रात मराठा समाजाचा प्रभावी नेता म्हणून एकनाथ शिंदेंचंच नाव आहे. त्यामुळे उद्या भविष्यात भाजपला एकनाथ शिंदेंसोबत राजकीय व्यवहार करताना निव्वळच स्वतःच्या मर्जीने काही करता येणार नाही. आज भाजपला सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीची फारशी भीती वाटावी असे चित्र नाही. तो पक्ष अंतर्गत धुसफुशीतच गांगरलेला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकात या राष्ट्रवादीचे फारसे आव्हान भाजपला नाहीच, मात्र एकनाथ शिंदेंचे तसे नाही. उद्या स्वतंत्र निवडणूक लढवायची म्हटली तरी एकनाथ शिंदे समर्थ आहेत. कार्यकर्ते जपायचे, संघटन जपायचे आणि सामान्यांच्या काळजाला हात घालायचा यात एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे आणि त्यांचे नेते माहीर आहेत. त्यामुळे राज्यात उभे आडवे घुसायचे म्हटले तर शिंदेंना तशी अडचण येणार नाही. त्यामुळे ही देखील भाजपची अडचण आहेच. म्हणूनच तर कोणत्या ना कोणत्या मार्गाने भाजपच्या निशाण्यावर शिवसेना नाही ना ?

 

Advertisement

Advertisement