Advertisement

रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरच्या मुसक्या आवळल्या

प्रजापत्र | Thursday, 29/10/2026
बातमी शेअर करा

बीड : शहरातील नगर रोड परिसरात रुग्णांच्या अज्ञानाचा फायदा घेत त्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या एका बनावट डॉक्टरचा आज (गुरुवारी) सकाळीच पर्दाफाश करण्यात आला आहे. जिल्हा शल्यचिकित्सकांच्या आरोग्य विभागाचे पथक, अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि शहर पोलिसांनी संयुक्त धडक कारवाई करत 'संजीवनी आयुर्वेदिक चिकित्सा केंद्र' या दवाखान्यावर छापा टाकला. या कारवाईत एका बोगस डॉक्टरला रंगेहाथ पकडण्यात आले असून, त्याला थेट ताब्यात घेण्यात आले आहे. ऐन शहरातच हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने वैद्यकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

जिल्हा रुग्णालयाला नगर रोड भागातील 'संजीवनी आयुर्वेदिक चिकित्सा केंद्रा'मध्ये बोगस डॉक्टरकडून चुकीचे उपचार केले जात असल्याची गोपनीय तक्रार प्राप्त झाली होती. या माहितीची गंभीर दखल घेत गुरुवारी सकाळीच पोलीस बंदोबस्तात या क्लिनिकवर छापा टाकण्यात आला.

 

असा चालायचा गोरखधंदा

आरोग्य विभागाच्या प्राथमिक तपासणीत अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा दवाखाना मुंबई, पुणे आणि बुलढाणा येथील नोंदणीकृत डॉक्टरांच्या नावे चालवला जात होता. आरोग्य विभागाने जेव्हा या नावांची आणि नोंदणीची पडताळणी केली, तेव्हा ते डॉक्टर बाहेरगावचे असल्याचे स्पष्ट झाले. प्रत्यक्षात मात्र, क्लिनिकमध्ये रुग्णांवर उपचार करणारा व्यक्ती तिसराच होता. या व्यक्तीकडे वैद्यकीय व्यवसायाची कोणतीही अधिकृत पदवी किंवा प्रमाणपत्र आढळून आलेले नाही. दुसऱ्याच डॉक्टरांच्या नावाचा गैरवापर करून हा 'मुन्नाभाई' निष्पाप रुग्णांच्या जीवाशी निर्ढावलेपणाने खेळत असल्याचे उघडकीस आले आहे.

 

औषधांचा साठा आणि रेकॉर्ड जप्त

पोलीस बंदोबस्तात आरोग्य आणि एफडीएच्या पथकाने दवाखान्याची कसून झडती घेतली. तेथून मोठ्या प्रमाणावर औषधांचा साठा आणि रुग्णांच्या नोंदी असलेले साहित्य जप्त करण्यात आले आहे. या महाभागाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरु आहे.

 

कारवायांची व्याप्ती वाढवण्याची मागणी

बीड शहर आणि संपूर्ण जिल्ह्यात असा हा एकमेव प्रकार नाही. गल्लोगल्ली असे अनेक बोगस डॉक्टर छुपेपणाने आपले बस्तान मांडून बसले आहेत आणि रुग्णांची आर्थिक व शारीरिक लूट करत आहेत. त्यामुळे प्रशासनाने ही मोहीम अधिक तीव्र करावी आणि अशा सर्वच बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी आग्रही मागणी आता नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.

 

चौकशीअंती होणार कठोर कारवाई : आरोग्य विभाग

या चिकित्सा केंद्रात सुरु असलेल्या प्रकाराची आम्ही सविस्तर चौकशी करत आहोत. घटनास्थळावरून काही औषधे जप्त करण्यात आली आहेत. तपासणीत असे निदर्शनास आले की, बोर्डावर असणारी डॉक्टरांची नावे वेगळीच आहेत आणि प्रत्यक्षात काम करणारा व्यक्ती भलताच आहे. उपचार करणाऱ्या व्यक्तीकडे अद्याप कोणतीही अधिकृत वैद्यकीय माहिती किंवा पदवी मिळालेली नाही. या सर्व प्रकरणाचा सविस्तर अहवाल तयार करण्याचे काम सुरु असून, चौकशी पूर्ण होताच संबंधितावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

 

Advertisement

Advertisement