Advertisement

मराठवाडा विभाग पदवीधर मतदारसंघात महायुतीमधल्या राष्ट्रवादीला मोठा धक्का अखेर बसलाच.विधानपरिषदेत वाट्याला आलेली ५ पैकी एकुलती एक जागा या पक्षाला राखता आली नाही.मतदारांची जनभावना असेल किंवा स्वतःच्या पक्षातील आणि महायुतीमधील नेत्यांची देखील भावना लक्षात घेतली न गेल्याचा फटका या पक्षाला बसला,त्याचवेळी मतदारांना केवळ गृहीत धरल्यास काय होते हा संदेश या निवडणुकीने दिला आहे.

   मराठवाडा विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक यावेळी अनेक अर्थांनी वेगळी होती.मुळातच या मतदारसंघात परंपरागत लढत असायची ती भाजप आणि पूर्वी काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादीमध्ये.भाजपकडून जयसिंग गायकवाड,श्रीकांत जोशी यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते,तर मागच्या तीन वेळा राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण येथून निवडून येत गेले.मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळासह अनेक संस्थांचे जाळे आणि अजित पवारांचे स्वतःचे नियोजन याचा वाटा यात मोठा असायचा.यावेळी प्रथमच येथील निवडणूक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी झाली,यात अजित पवारांचे नसणे जितके राष्ट्रवादीला जाणवले तितकेच शरद पवारांनी स्वतः घातलेले लक्ष्य राष्ट्रवादी शप चे प्रतापसिंह पाटील यांच्यासाठी फायद्याचे ठरले.

मात्र सतीश चव्हाण यांची अडचण केवळ अजित पवारांचे नसणे इतकीच नव्हती तर मतदार आणि स्वकियांच्याच अजब चक्रव्यूहात सतीश चव्हाण अडकले ते बाहेर निघूच शकले नाहीत.मुळात मागच्या काही निवडणुकांमध्ये सतीश चव्हाण यांचे मताधिक्य वाढत होते हे खरे असले तरी त्यांचा मतदारांशी संपर्क मात्र कमी होत होत तुटल्यात जमा झाला.शिक्षण संस्था आणि सिनेटच्या जोरावर आपले राजकारण चिरंतन राहिलं याच भ्रमात सतीश चव्हाण राहिले. दुसरीकडे सामान्य मतदार मात्र त्यांच्यापासून दुरावला आणि त्या मतदारांना शरद पवारांनी सक्षम पर्याय दिला.

दुसरी बाजू सतीश चव्हाणांच्या स्वकियांची. गेवराईचे पंडित असतील किंवा परभणीचे विटेकर,त्यांचे प्रतापसिंहांशी जवळचे नाते,त्यातच सतीश चव्हाण यांच्यामुळेच आपल्या नेत्यांची उमेदवारी गेली,ही भावना शिवछत्र च्या मावळ्यांमध्ये जी ठासून भरली ती स्वतः अमरसिंह पंडितांनी अनेक भाषणे करून देखील निघाली नाही.सतीश चव्हाणांच्या पराभवाशिवाय या मतदारसंघात इतरांना भवितव्य नाही राष्ट्रवादीच्या अनेकांना जसे पक्के माहीत होते,तसेच भाजपलाही. त्यामुळे भाजप येथे फारसा सक्रिय नव्हताच.महायुतीमधील आ.प्रशांत बंब असतील किंवा आ.अब्दुल सत्तार,सतीश चव्हाणांच्या मार्गातले अडथळे दूर झालेच नाहीत.त्यातच एमपीएससी आंदोलनाकडे सतीश चव्हाणांचे असलेले दुर्लक्ष, मनोज जरांगेंसोबतच्या संबंधांमुळे ओबीसीमध्ये असलेला अविश्वास, स्थानिक राजकीय गणिते मांडत प्रत्येक ठिकाणी कोणाचे फोटो घ्यायचे याबद्दलची धरसोड हे सारे सतीश चव्हाणांसाठी अडचणीचे ठरत गेले.हा मतदारसंघ म्हणजे सतीश चव्हाणांची खाजगी जहागिरी हा समज अनेक नेत्यांना उध्वस्त करायचा होता आणि मतदारांनाही.उमेदवारी जाहीर करताना सुनेत्रा किंवा पार्थ पवारांनी याचा विचार केलाच नाही आणि परिणाम आता समोर आहे.

 

Advertisement

Advertisement