Advertisement

धरणांच्या उघड्या जमिनीवर घेणार चारा पीक

प्रजापत्र | Wednesday, 21/10/2026
बातमी शेअर करा

बीड जिल्ह्यात सध्या भेडसावत असलेल्या भीषण दुष्काळामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाने एक अनोखा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील धरणे, तलाव आणि प्रकल्पांची पाणीपातळी खालावल्यामुळे उघड्या पडलेल्या गाळपेरा (सुपीक) जमिनीवर आता चारा पिकांचे उत्पादन घेतले जाणार आहे. यासंदर्भात नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात एक महत्त्वाची आढावा बैठक संपन्न झाली.

जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीत जनावरांसाठी मुबलक हिरवा चारा कसा उपलब्ध होईल, यावर सविस्तर चर्चा झाली. धरणांच्या बुडीत क्षेत्रातील सुपीक जमिनीचा पुरेपूर वापर करून चाऱ्याचा तुटवडा भरून काढणे, हे या उपक्रमाचे मुख्य लक्ष्य आहे. यासाठी संपूर्ण जिल्ह्यातील गाळपेरा जमिनीची आकडेवारी गोळा करून तेथे चारा लागवडीची चाचपणी केली जाईल. तसेच, योग्य चारा पिकांची निवड करून सर्व शासकीय विभागांच्या समन्वयातून या योजनेची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे.

या महत्त्वपूर्ण बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितिन रहमान, अधीक्षक अभियंता पल्लवी जगताप, नखाते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे, तसेच जिल्हा पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय उपायुक्त डॉ. कदम यांच्यासह इतर संबंधित अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

Advertisement

Advertisement