बीड: प्रवासादरम्यान नागरिकांची नजर चुकवून दागिने व पैशांची चोरी करणाऱ्या एका महिला चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) बेड्या ठोकल्या आहेत. या महिलेच्या ताब्यातून चोरीतील रोख रक्कम आणि १७ ग्रॅम सोन्याचे दागिने असा एकूण सुमारे अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका चोरीच्या गुन्ह्याचा (गु.र.नं. ३३६/२०२६, कलम ३०३(२) BNS) स्थानिक गुन्हे शाखेकडून समांतर तपास सुरू होता. या तपासादरम्यान, गुन्ह्यातील चोरीचे सोने विकण्यासाठी एक महिला बीड शहरातील गोरे वस्ती परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती.
या पक्क्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने गोरे वस्ती परिसरात सापळा रचला आणि संशयित महिलेला ताब्यात घेतले. तिची कसून चौकशी केली असता, तिने या चोरीच्या गुन्ह्यात आपला सहभाग असल्याची स्पष्ट कबुली दिली. पोलिसांनी तिच्याकडून चोरीतील रोख रक्कम आणि १७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा जवळपास अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील कायदेशीर कारवाई आणि सखोल तपासासाठी या महिलेला शिवाजीनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
सदरची उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, उपनिरीक्षक श्रीराम खटावकर, पोलीस हवालदार सोमनाथ गायकवाड, स्वाती मुंडे, विकास राठोड, अंमलदार अशपाक सय्यद, मनोज परजणे, बबन सलगर आणि चालक हवालदार नितीन वडमारे यांच्या पथकाने पार पाडली.

