बीड/बार्शी : यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यातून स्वतःच्या हक्काच्या अधिवासाच्या शोधात निघालेल्या एका पट्टेदार वाघाने आता बार्शी तालुक्यातील 'कारी' परिसरात आपला मुक्काम हलवला आहे. २०२२ मध्ये टिपेश्वरमधील 'टी-२२' वाघिणीच्या पोटी जन्मलेला हा नर वाघ गेल्या काही वर्षांपासून अन्न आणि नव्या जागेसाठी तब्बल ५ जिल्ह्यांची (लातूर, धाराशिव, सोलापूर, बीड आणि अहिल्यानगर) भ्रमंती करत आहे.
सध्या चार वर्षांचा असलेला हा वाघ तब्बल २०० किलो वजनाचा असून त्याच्या पंजाचा आकार १६ सेंटीमीटर इतका मोठा आहे. २०२३ मध्ये चंद्रपूर-यवतमाळच्या जंगलातून तो बाहेर पडला. १४ डिसेंबर २०२४ रोजी धाराशिव जिल्ह्यातील पार्टी भागात त्याचा पहिला अधिकृत फोटो समोर आला होता. त्यानंतर अवघ्या काही दिवसांतच (१९ डिसेंबर २०२४) येडशी अभयारण्यात तो ट्रॅप कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला.
या वाघाला सुरक्षितपणे जेरबंद करण्यासाठी वनविभागाने १३ जानेवारी ते एप्रिल २०२५ या काळात विशेष मोहीम राबवली होती. मात्र, वाघाने सातत्याने आपली जागा बदलल्याने वनविभागाच्या पथकाला रिकाम्या हाताने परतावे लागले.
पाच जिल्ह्यांच्या सीमेवर वावरत असताना २० ऑगस्ट २०२६ रोजी आष्टी तालुक्यातील ब्रह्मगाव वनक्षेत्रात तो पुन्हा एकदा कॅमेऱ्यात दिसला. मात्र, तेव्हापासून तो अचानक दिसेनासा झाला होता. तो नेमका कुठे गेला, याबाबत नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता होती. अखेर २० ऑक्टोबरपर्यंत गायब असलेल्या या वाघाचा सध्याचा ठावठिकाणा समोर आला असून, तो बार्शीच्या कारी परिसरात असल्याची माहिती मिळाली आहे.
विशेष म्हणजे, आष्टी आणि पाटोदा तालुक्यांच्या वनक्षेत्रात यापूर्वी १९१० ते १९२० च्या दरम्यान वाघांच्या नोंदी आढळल्या होत्या. त्यानंतर तब्बल एक शतकाहून अधिक काळ लोटल्यानंतर या परिसरात वाघाचे अस्तित्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. निसर्ग आणि वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने ही एक अतिशय सकारात्मक आणि आशादायी घटना मानली जात आहे.

