Advertisement

निलंबित कारागृह कर्मचाऱ्याच्या नावाने बनावट पत्रव्यवहार !

प्रजापत्र | Saturday, 17/10/2026
बातमी शेअर करा

बीड-येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृह पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.कारागृहातील निलंबित कर्मचाऱ्याच्या नावाने मनोज जरांगे,खा.सुप्रिया सुळे यांना पत्र पाठविण्यात आले असून सदरचा पत्रव्यवहार करताना बनावट नावाचा वापर करण्यात आल्याची तक्रार पोलीस अधिक्षक यांच्यासह शिवाजीनगर पोलिसांकडे देण्यात आली आहे.त्यामुळे आता बीड पोलीस या तक्रारीची दखल कशी देतात आणि यात बनावट पत्र पाठविणार व्यक्ती कोण?हे तपासातून निष्पन्न होणार आहे.

   काही दिवसांपूर्वी कार्यालयीन कामकाजाचा ठपका ठेवत सुधाकर मुंडे यांना निलंबित करण्यात आले होते.ते बीडच्या जिल्हा मध्यवर्ती कारागृह वर्ग-२ मध्ये शिपाई पदावर कार्यरत आहेत.त्यांच्या निलंबनाच्या कार्यकाळात त्यांच्या नावाने गोपनीय पत्र मोठा लिपापा तयार करत त्यात काही कागदपत्रे टाकून छत्रपती संभाजीनगर येथून मनोज जरांगे,खा सुप्रिया सुळे यांना पोस्टाद्वारे पाठविण्यात आले.मात्र ही कागदपत्रे अर्धवट माहितीमुळे संबंधितांकडे न जाता पोस्ट अधिकाऱ्यांनी मुंडे यांना परत फोन करत आपले पार्सल घेऊन जाण्याचे सांगितले.यावेळी श्री.मुंडे यांनी आपण कोणतेही पार्सल कोणत्याही व्यक्तीला पाठविले नसल्याचे सांगत सदरचे पार्सल स्वीकारले नाही.मात्र त्यामुळे पोस्ट अधिकाऱ्याने मुंडे यांच्या माहितीस्तव पार्सलचा फोटो त्यांना मोबाईल क्रमांक घेऊन व्हाटसअँपवर टाकला.दरम्यान सदरचे फोटो पाहिल्यानंतर सुधाकर मुंडे यांना धक्का बसला.आपल्या नावाचा कोणी तरी वापर करून बनावट पद्धतीने पत्र पाठवित असल्याचे त्यांना लक्षात येताच पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत यांची भेट घेऊन त्यांना घडलेला प्रकार सविस्तर सांगितला.याशिवाय बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात देखील याबाबत तक्रार देण्यात आल्याची माहिती आहे.बीडच्या कारागृहातील निलंबित कर्मचाऱ्याच्या नावाने कोण पत्रव्यवहार करत आहे? हे पोलीस तपासातून समोर येणार का? हे देखील पाहणे देखील महत्वाचे ठरणार असून याप्रकारामुळे मात्र बीडचे कारागृह पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

 

अर्ज प्राप्त,चौकशी सुरु 

सुधाकर मुंडे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार अर्ज दिला आहे. आम्ही त्याची चौकशी करत आहोत. चौकशीअंती पुढील कारवाई करू अशी माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांनी दिली.

Advertisement

Advertisement