बीड दि. १४ (प्रतिनिधी ) :मागील सहा महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत असलेल्या कथित भूसंपादन मावेजा घोटाळ्यातील आरोपी सनदी अधिकारी अविनाश पाठक यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. घोडेस्वार यांच्या पीठाने हा जामीन मंजूर केला आहे. बुधवारी न्यायालयाने केवळ ऑपरेटिव्ह आदेश दिले असून सविस्तर निकालासाठी वेळ लागणार आहे.
बीड जिल्ह्यातील कथित भूसंपादन मावेजा घोटाळ्यामुळे राज्यात खळबळ माजली होती. बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोव्हेंबर २०२५ मध्ये दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात सुरुवातीला काही महसूल आणि महामार्ग विभागाच्या कर्मचाऱ्यांसह वकिलांना आरोपी करण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात बीडचे माजी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना आरोपी करून त्यांना मे महिन्यात अटक केले होते . तेव्हापासून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
जिल्हाधिकारी पदावरून बदली झाल्यानंतर देखील त्यांनी मागच्या तारखेत स्वाक्षऱ्या करून लवादाचे आदेश निर्गमित केले आणि यातून भूसंपादन मावेजा वाटपात घोटाळा झाल्याचा आरोप पाठक यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या सर्व आरोपांचा पाठक यांनी सुरुवातीपासून इन्कार केला असून न्यायालयात देखील तीच भूमिका त्यांच्यावतीने घेण्यात आली होती.
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने त्यांची जामिनाची याचिका यापूर्वी एकदा फेटाळली होती, मात्र या प्रकरणातील पुरवणी दोषारोपपत्र देखील दाखल झाल्याने पाठक यांच्या वतीने पुन्हा उच्च न्यायालयात धाव घेण्यात आली होती. त्यांच्या जमीन अर्जावर न्या. घोडेस्वार यांच्यासमोर सुनावणी झाली, यात त्यांनी अविनाश पाठक यांचा अर्ज मंजूर करत त्यांना जामीन दिला आहे. अविनाश पाठक यांच्यासाठी हा मोठा दिलासा आहे.

