Advertisement

मनोज जरांगे यांच्या सांगण्यावरूनच माझ्यावर जीवघेणा हल्ला

प्रजापत्र | Sunday, 11/10/2026
बातमी शेअर करा

बीड-मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे एकेकाळचे सहकारी अमोल खुणे यांना काही जमावाकडून बेदम मारहाण केल्याचा प्रकार रविवारी दुपारी घडला आहे. 'तू मनोज जरांगे यांच्या विरोधात का बोलतोस?' असा जाब विचारत बीड तालुक्यातील पाली येथील नागनाथ मंदिरात हा हल्ला करण्यात आला. विशेष म्हणजे, खुद्द मनोज जरांगे यांनीच आपल्याला मारण्यासाठी 'सुपारी' दिल्याचा खळबळजनक आरोप अमोल खुणे यांनी केला आहे.

 

मंदिराचे गेट बंद करून लाकडी दांडक्यांनी मारहाण
अमोल खुणे रविवारी दुपारच्या सुमारास पाली येथील नागनाथ मंदिरात दर्शनासाठी गेले होते. त्याच दरम्यान तुळजापूरहून देवीची ज्योत घेऊन काही तरुण त्या ठिकाणी आले. खुणे यांनी केलेल्या दाव्यानुसार, या तरुणांनी अचानक मंदिराचा दरवाजा बंद करून घेतला आणि लाकडी दांडक्यांनी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात खुणे यांच्या दोन्ही हातांना जबर दुखापत झाली असून, त्यांच्यावर सध्या बीडच्या जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

 
दसरा मेळाव्याला रोखण्यासाठीच हल्ला
नारायणगडावर आयोजित करण्यात येणाऱ्या दसरा मेळाव्याला आपण हजेरी लावणार असल्याचे अमोल खुणे यांनी आधीच स्पष्ट केले होते. आपल्याला या मेळाव्याला जाता येऊ नये आणि तिथे पोहोचण्यापासून रोखावे, या उद्देशानेच हा पूर्वनियोजित हल्ला घडवून आणण्यात आल्याचा दावा खुणे यांनी केला आहे.

 
पोलिसांकडून तपासाची चक्रे वेगवान
या घटनेमुळे बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलिसांनी तातडीने तपासाला सुरुवात केली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी थेट घटनास्थळी जाऊन पाहणी केली. अमोल खुणे यांच्यावर हल्ला करणारे ते तरुण नेमके कोण होते आणि या हल्ल्यामागचे खरे सूत्रधार कोण आहेत, याचा सखोल तपास आता पोलिसांकडून केला जात आहे.

Advertisement

Advertisement