छत्रपती संभाजीनगर:
एकिकडे मराठवाडा भीषण दुष्काळाशी झुंजत असताना, दुसरीकडे मात्र मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यावर डल्ला मारण्याचा प्रयत्न सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नाशिक जिल्ह्यातील मुकणे, भाम, वाकी आणि भावली या चार धरणांतील जे पाणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर आणि गंगापूर तालुक्यांसाठी आरक्षित आहे, त्यातील तब्बल ५० टक्के पाणी आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी वळवण्याचा घाट घातला जात आहे.
काय आहे नेमका प्रकार?
आवर्षणप्रवण क्षेत्रात मोडणाऱ्या वैजापूर आणि गंगापूर तालुक्यांची तहान भागवण्यासाठी १९७९ ते २०१६ या काळात नाशिकमध्ये मुकणे, भाम, भावली आणि वाकी ही चार धरणे बांधण्यात आली. या धरणांतील ३८६.१० दशलक्ष घनमीटर (दलघमी) पाणीसाठा नांदूर मधमेश्वर जलद कालव्याद्वारे सिंचनासाठी राखीव आहे. या पाण्यावर वैजापूर आणि गंगापूरमधील १०२ गावांतील तब्बल ४३ हजार ८६० हेक्टर शेती अवलंबून आहे. मात्र, आता या धरणांतील निम्म्याहून अधिक म्हणजेच १९०.७९ दलघमी पाणी कुंभमेळ्यासाठी (बिगर सिंचन) आरक्षित करण्याचा प्रस्ताव आहे. विशेष म्हणजे, मुकणे धरणाजवळच नाशिक महापालिकेकडून २७४ एमएलडी क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्पही वेगाने उभारला जात आहे.
शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ
यंदा पावसाने पाठ फिरवल्यामुळे मराठवाड्यात भीषण पाणीबाणी आहे. मागील केवळ आठ महिन्यांत दुष्काळ आणि नापिकीला कंटाळून तब्बल ९४५ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. अशा विदारक स्थितीत हक्काचे पाणी हिरावून घेतले गेल्यास शेती कशी जगवायची, असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.
मराठवाडा समन्यायी पाणी वाटप संघर्ष समितीचा एल्गार
पाणी पळवण्याच्या या प्रस्तावाविरोधात 'मराठवाडा समन्यायी पाणी वाटप संघर्ष समिती'ने आक्रमक पवित्रा घेतला आहे. समितीचे अध्यक्ष अण्णासाहेब शिंदे, माजी आमदार विजय गव्हाणे, सुशीला मोराळे आणि दत्तात्रय पाटील यांच्या शिष्टमंडळाने गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले असून, तीव्र जनआंदोलनाचा इशारा दिला आहे.

