बीड : प्रजापत्र न्यूज नेटवर्क
बीड जिल्ह्यात अवैध धंदे, अमली पदार्थांची तस्करी, साठवणूक व विक्री करणाऱ्यांविरुद्ध पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवगण राजुरी येथे एक मोठी आणि धडक कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल ६० किलो ७० ग्रॅम वजनाचा आणि ३० लाख ३ हजार ५०० रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला असून, याप्रकरणी ६० वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय बातमीदारामार्फत पक्की माहिती मिळाली होती की, नवगण राजुरी (ता. जि. बीड) येथील गौसखान उर्फ बाबू उमरखान पठाण (वय ६० वर्षे) याने अवैध विक्री करण्याच्या उद्देशाने त्याच्या राहत्या घरात मोठ्या प्रमाणात गांजा साठवून ठेवला आहे.
चार गोण्यांमध्ये लपवला होता गांजा
मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी (९ ऑक्टोबर) रात्री १०:१५ वाजण्याच्या सुमारास गौसखान पठाण याच्या घरावर छापा टाकला. घराची झडती घेतली असता, चार वेगवेगळ्या गोण्यांमध्ये साठवून ठेवलेला हिरवट रंगाचा, पाने, फुले, बिया व बोंडे असलेला गांजासदृश अमली पदार्थ पोलिसांना मिळून आला. या अमली पदार्थाचे इलेक्ट्रॉनिक वजनकाट्यावर वजन केले असता तो एकूण ६० किलो ७० ग्रॅम असल्याचे आणि त्याची अंदाजे किंमत ३०,०३,५००/- रुपये असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून हा मुद्देमाल जप्त केला आहे.
NDPS कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
या प्रकरणी आरोपी गौसखान उर्फ बाबू उमरखान पठाण याच्याविरुद्ध बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात एनडीपीएस कलम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बीड ग्रामीण पोलीस करत आहेत.
माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय राहणार; पोलिसांचे आवाहन
अमली पदार्थांच्या अवैध व्यवसायाला कोणत्याही परिस्थितीत थारा दिला जाणार नाही आणि यापुढेही अशीच कठोर कारवाई सुरू राहील, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. तसेच, अमली पदार्थ विक्रेते, पुरवठादार किंवा साठवणुकीच्या ठिकाणाबाबत माहिती असल्यास नागरिकांनी निर्भयपणे "अमली पदार्थ विरोधी कक्ष" संपर्क क्रमांक ९२७०२४३२०० वर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस दलाने केले आहे. माहिती देणाऱ्याची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, अशी ग्वाहीदेखील पोलिसांनी दिली आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, बीड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव, उपनिरीक्षक श्रीराम खटावकर, सपोनि देविदास सोनवळे, तसेच गुन्हे शाखा व बीड ग्रामीण पोलिसांच्या संयुक्त पथकातील अंमलदारांनी पार पाडली.

