बीड : माजलगाव येथील हृदयरोगतज्ज्ञ डॉ. राधाकिसन डाके यांना मारहाण करणे , रुग्णालयातच डांबून ठेवणे आणि रुग्णालयाची तोडफोड केल्याच्या प्रकरणात अखेर ४ दिवसानंतर गुन्हा दाखल झाला आहे. महाराष्ट्र वैद्यकीय सेवा आणि व्यक्ती अधिनियमांतर्गत जिल्ह्यात दाखल झालेला हा पहिलाच गुन्हा असेल.
जिल्ह्यातील माजलगाव येथील हृदयरोगतज्ज्ञ डॉ. राधाकिसन डाके यांच्या रुग्णालयात एका जोखमीच्या रुग्णावर उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला होता. त्यामुळे रुग्णाचे नातेवाईक व इतरांनी २ ऑक्टोबर रोजी रुग्णालयात तोडफोड करत डॉक्टर आणि रुग्णालयीन स्टाफला मारहाण केली. तसेच रुग्णालयातील पेपर हिसकावून घेतले, डॉक्टरांना केबिनमध्ये डांबले आणि रुग्णालयाची तोडफोड केली होती.
या प्रकरणात डॉक्टरांना मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई कारवाई करावी यासाठी आयएमए आग्रही होती. अखेर या प्रकरणात आयएमएने थेट पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधल्याचे सांगितले जाते. त्यानंतर मंगळवारी तरी उशिरा या प्रकरणात डॉ. राधाकिसन डाके यांच्या फिर्यादीवरून पंकज साळवे, विलास साळवे ,तुळशीराम साळवे, आदित्य साळवे ,प्रेम साळवे, प्रमोद सोनवणे ,बाळासाहेब लहाडे ,सचिन लहाडे ,अशोक साळवे,संदेश डोंगरे व इतर अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
अजामीनपात्र गुन्हा
या कायद्यांतर्गत दाखल झालेला गुन्हा हा अजामीनपात्र गुन्हा आहे. डोंबिवली येथील प्रकरणात अशाच कलमाखाली उच्च न्यायालयाने दिलेला जमीन सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेला आहे. या कायद्याखाली दाखल झालेला हा बीड जिल्ह्यातील पहिलाच गुन्हा असावा .

