बीड : प्रजापत्र नेटवर्क
रात्रीच्या वेळी घराच्या गॅलरीचा दरवाजा तोडून चोरी करणाऱ्या एका तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी घरफोडीचे दोन गुन्हे उघडकीस आणले असून, आरोपीकडून २४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अभिषेक शेषेराव काशीद (वय २४, रा. चक्रधरनगर, बीड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी नारायणा स्कूलमधील शिक्षक आशुतोष नाथ चौबे (वय ३८) यांनी ५ ऑक्टोबर रोजी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. चौबे हे बीडमधील शिंदे नगर (फेज ३) परिसरात एका इमारतीत दुसऱ्या मजल्यावर भाड्याने राहतात. रविवारी (दि. ४ ऑक्टोबर) रात्री ते आणि त्यांची पत्नी घरात झोपलेले असताना, अज्ञात चोरट्याने त्यांच्या गॅलरीच्या दरवाजाचा कडी-कोंडा तोडून घरात प्रवेश केला. चोरट्याने घरातून पती-पत्नीचे एकूण २२ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल चोरून नेले होते. या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
असा लागला चोरट्याचा शोध
या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या आदेशावरून उपनिरीक्षक श्रीराम खटावकर आणि त्यांच्या पथकाने सुरू केला. तपासादरम्यान गोपनीय बातमीदार आणि तांत्रिक पुराव्यांवरून हा गुन्हा अभिषेक शेषेराव काशीद यानेच केल्याचे पोलिसांना निष्पन्न झाले. पोलिसांनी तातडीने चक्रधरनगर परिसरातून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता, शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील गुन्ह्यासोबतच बीड शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेला (गु.र.नं. १५१/२०२६) आणखी एक घरफोडीचा गुन्हा उघडकीस आला आहे. पोलिसांनी आरोपी अभिषेककडून एकूण २४ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख आणि पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्रीराम खटावकर, हवालदार अर्जुन यादव, अंमलदार अशपाक सय्यद, मनोज परजणे, विकी सुरवसे आणि चालक नितीन वडमारे यांच्या पथकाने पार पाडली.

