Advertisement

मराठवाडा पदवीधर निवडणूक: ठाकरे गटाकडून दिलीप घुगेंचा उमेदवारी अर्ज दाखल

प्रजापत्र | Monday, 05/10/2026
बातमी शेअर करा

छत्रपती संभाजीनगर/बीड : आगामी मराठवाडा (औरंगाबाद) पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या रणधुमाळीला वेग आला असून, प्रमुख राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार दिलीप घुगे यांनी आज (५ ऑक्टोबर) जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तर दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसने सलग पाचव्यांदा सतीश चव्हाण यांच्यावरच विश्वास दाखवत त्यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे.

 

दिलीप घुगे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार दिलीप घुगे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आपला अर्ज सुपूर्द केला. अर्ज भरण्यापूर्वी त्यांनी छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकात जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले. याप्रसंगी त्यांच्यासोबत शिवसेना नेते अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे, आमदार राहुल पाटील, उपनेते सुभाष पाटील, प्रवीण स्वामी यांच्यासह अनेक पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

पदवीधरांच्या प्रश्नांसाठी लढणार - दिलीप घुगे

अर्ज दाखल केल्यानंतर प्रतिक्रिया देताना घुगे म्हणाले की, "शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने मी या निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे. मराठवाड्यातील सुशिक्षित पदवीधरांना भेडसावणाऱ्या शिक्षण आणि रोजगाराच्या समस्या सोडवण्यासाठी मी पूर्ण ताकदीने लढा देईन आणि त्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी खंबीरपणे आवाज उठवेन.

 

सतीश चव्हाण पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात

याच मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सतीश भानुदासराव चव्हाण यांना पुन्हा एकदा अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांनी चव्हाण यांच्या उमेदवारीचे अधिकृत पत्र प्रसिद्ध केले.

 

सतीश चव्हाण यांनी या मतदारसंघातून २००८, २०१४, २०२० आणि आता २०२६ अशा सलग टर्म्समध्ये पदवीधरांचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांचा या मतदारसंघातील दांडगा अनुभव आणि पकड पाहता, राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा एकदा त्यांच्या खांद्यावर ही मोठी जबाबदारी सोपवली आहे. या दोन्ही प्रमुख उमेदवारांच्या घोषणेमुळे आता मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील लढत अतिशय चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

Advertisement

Advertisement