बीड: दुष्काळी परिस्थिती आणि मुलीच्या लग्नासाठी लागणाऱ्या आर्थिक खर्चाच्या विवंचनेतून बीड तालुक्यातील पिंपरनई येथील एका ४४ वर्षीय शेतकऱ्याने आपल्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. विक्रम बाबासाहेब दाभाडे असे या दुर्दैवी शेतकऱ्याचे नाव असून, शनिवारी (दि. ३) सकाळी ही घटना घडली. कर्त्या पुरुषाच्या अशा अचानक जाण्याने दाभाडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विक्रम दाभाडे हे दररोजच्या नित्यनेमाने सकाळी दूध घालून आणि शेतातील गाय बांधून घराकडे परतत असत. शनिवारी सकाळीही ते शेतात गेले होते. मात्र, नेहमीच्या वेळेत ते घरी न परतल्याने त्यांची १८ वर्षीय मुलगी साक्षी ही त्यांचा शोध घेण्यासाठी शेताकडे गेली. त्यावेळी तिला आपले वडील विक्रम दाभाडे हे शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. हे भयावह दृश्य पाहून तिने हंबरडा फोडला.
सध्या परिसरात दुष्काळी परिस्थिती असल्याने शेतीतून हाती काही लागत नाही. त्यातच मुलीच्या लग्नासाठी लागणाऱ्या पैशांची आणि आर्थिक खर्चाची चिंता विक्रम यांना सातत्याने सतावत होती. याच आर्थिक विवंचनेतून व नैराश्यातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती त्यांच्या वडिलांनी दिली आहे. तथापि, या आत्महत्येचे नेमके कारण पोलीस तपासानंतरच अधिकृतपणे स्पष्ट होईल.
विक्रम दाभाडे यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी अश्विनी, मुले प्रशांत (वय २२), सुशांत (वय २०) आणि मुलगी साक्षी (वय १८), तसेच वडील बाबासाहेब दाभाडे आणि आई सुंदरबाई दाभाडे असा मोठा परिवार आहे.

