Advertisement

अखेर पोलीस निरीक्षक शरद भुतेकर नियंत्रण कक्षात

प्रजापत्र | Sunday, 13/09/2026
बातमी शेअर करा

बीड-भेसळीसाठी वापरल्या जाणाऱ्या पावडरप्रकरणात 'लाखमोला'च्या आरोपाने चर्चेत आलेल्या आणि आष्टी पोलीस ठाणे नागरिकांच्या सुखसोईपेक्षा तडजोडीचे केंद्र ठरू लागल्याच्या चर्चांमुळे अखेर पोलीस निरीक्षक शरद भुतेकर यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.त्यांच्याजागी आता परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक भारत पांढरे हे काम पाहणार आहेत.पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत यांनी रविवारी याबाबत आदेश काढले आहेत.
     आष्टीचे पोलीस निरीक्षक म्हणून शरद भुतेकर यांच्या कामकाजाविषयी वरिष्ठ अधिकारी देखील फारसे समाधानी नव्हते.काही दिवसांपूर्वी आष्टीत दुधाच्या भेसळीसाठी लागणाऱ्या पावडरचा मोठा साठा पकडल्यानंतर त्यात पोलीस निरीक्षकांनी मोठयाप्रमाणावर 'लाखमोला'च्या मागण्या मांडल्याच्या चर्चा होत्या.तेंव्हापासून त्यांच्याबाबतीत वादाचे वादळ निर्माण होऊ लागले.यासोबतच बसस्थानक चोरट्यांसाठी आंदण असणे,अवैध धंद्यांवर निर्बंध नसणे आणि पोलीस ठाण्यात नागरिकांच्या सोयीपेक्षा व्यक्तिगत स्वार्थाकडे लक्ष्य दिल्याच्या आरोपामुळे आष्टीत त्यांच्या कामकाजाबाबत देखील नाराजी व्यक्त होत होती.अखेर या सर्व पार्श्वभूमीवर आणि दैनिक प्रजापत्रने भुतेकरांच्या कार्यप्रणालीची मालिका प्रकाशित केल्यानंतर पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत यांनी त्यांची नियंत्रण कक्षात बदली करत त्यांच्या जागी पुढील तीन महिन्यांसाठी भारत पांढरे यांच्याकडे पदभार सोपविला आहे.भारत पांढरे यांनी बीड विभागात अनेक मोठमोठ्या कारवाया करून अवैध धंद्यावाल्यांमध्ये दहशत निर्माण केली होती.अखेर आष्टीत आता त्यांची नियुक्ती झाल्यामुळे पांढरेंकडून अश्याच कारवायांची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

Advertisement

Advertisement