जालना : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलेच तापले आहे. अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांचे गेल्या १४ दिवसांपासून सुरू असलेल्या बेमुदत उपोषणावर अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही.या पार्श्वभूमीवर आज, १२ सप्टेंबर रोजी दुपारी समर्थकांची एक महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत जरांगे पाटील यांनी आपल्या आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट करत मुंबईत धडक देण्याची अधिकृत घोषणा केली आहे.
बैठकीत उपस्थितांना संबोधित करताना मनोज जरांगे यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली. “नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही,” असा इशारा देत त्यांनी स्पष्ट केले की आता आंदोलकांची पावले मुंबईच्या दिशेने पडतील. सरकारकडून ठोस पावले उचलली जात नसल्याने अखेर मुंबई गाठण्याशिवाय पर्याय उरलेला नाही, असे त्यांनी नमूद केले.मनोज जरांगे यांनी यापूर्वीच १२ तारखेनंतर मुंबईला जाण्याचा इशारा दिला होता. आजच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. सगेसोयरे अध्यादेशाची अमलबजावणी आणि मराठा आरक्षणाच्या सर्व मागण्या पूर्णपणे मान्य झाल्याशिवाय माघार घेणार नाही, या भूमिकेवर जरांगे पाटील ठाम आहेत.जालना येथील अंतरवली सराटीतून सुरू होणारा हा मोर्चा पाटोदा, श्रीगोंदा, हडपसर (पुणे) आणि खोपोली येथे चार मुक्काम करत पाचव्या दिवशी मुंबईच्या आझाद मैदानात शांततापूर्ण मार्गाने धडकणार आहे.अंतरवली सराटीतून सुरू होणारा हा मोर्चा अत्यंत शांततापूर्ण मार्गाने मुंबईच्या दिशेने पुढे सरकेल. चार ठिकाणी मुक्काम करत पाचव्या दिवशी हा मोर्चा मुंबईत दाखल होईल.
असा असेल मनोज जरांगेंचा मुंबईचा मार्ग:
१५ सप्टेंबर: अंतरवली सराटीतून मोर्चाला सुरुवात; पहिला मुक्काम पाटोदा (जि. बीड).
१६ सप्टेंबर: दुसरा मुक्काम श्रीगोंदा (जि. अहिल्यानगर).
१७ सप्टेंबर: तिसरा मुक्काम हडपसर (पुणे).
१८ सप्टेंबर: चौथा मुक्काम खोपोली (रायगड).
१९ सप्टेंबर: सकाळी १० वाजता मोर्चा थेट मुंबईच्या ऐतिहासिक आझाद मैदानात धडकेल.

