Advertisement

बीड दि. २२ (प्रतिनिधी ): इमारती आणि भौतिक सुविधांचा गवगवा केला जात असलेल्या बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार मिळतील तेव्हा तेव्हा मिळतील , मात्र रुग्णाला दाखल करण्याच्या प्रक्रियेतच त्याचा जीव जाईल अशी परिस्थिती निर्माण होत असल्याचे चित्र वारंवार पाहायला मिळत आहे. एखाद्या रुग्णाच्या सोबत कोणी नसेल तर त्याला दाखल होईपर्यंत किमान ५-६ ठिकाणी हेलपाटे मारावे लागत आहेत, हि प्रक्रिया सोपी करावी यासाठी मात्र कोणी पुढाकार घेताना दिसत नाही.

   बीडच्या जिल्हा रुग्णालयाने एकेकाळी रुग्णसेवेमध्ये मोठे नाव निर्माण केले होते, मात्र मागच्या काळात हेच जिल्हा रुग्णालय वेगवेगळ्या कारणांनी वादग्रस्त ठरत आहे. शास्त्रक्रियनच्या दरम्यान होत असलेला गोंधळ असेल किंवा दाखल रुग्णांवर उपचार करताना होणार निष्काळजीपणा , यामुळे जिल्हा रुग्णालयाच्या एकूणच व्यवस्थापनाबद्दल प्रश्नचिन्ह लागावे अशी परिस्थिती आहे. त्यातच आता रुग्णांवर उपचार करण्यापेक्षा तपासाला रुग्णालयात दाखल करण्यासाठीच्या किंवा बाह्य रुग्णाला प्रत्यक्ष उपचार मिळण्याच्या प्रक्रियाच मोठी डोकेदुखी बनल्या आहेत.अपघात किंवा इतर गोष्टींसाठी आलेल्या रुग्णांना देखील उपचार सुरु होण्याअगोदर स्वतःच्या वेदना तशाच सहन करत वेगवेगळ्या खिडक्यांमध्ये धावाधाव करावी लागते. रुग्णासोबत कोणी नातेवाईक नसतील तर सारे काही रुग्णाला करावे लागते आणि कोणी सोबत असेल तर त्याला रुग्णाकडे पाहायचे का औपचारिकता पूर्ण करत फिरायचे असा प्रश्न पडावा असे चित्र आहे. अपघाताचे रुग्ण आल्यानंतर अगोदर एमएलसी रजिस्टर भरण्याची कारवाई केली जाते, तेथून दिलेल्या चिट्ठीवर रुग्णाचे नाव नसते, मग रुग्ण किंवा सोबतच्यानी अगोदर नाव नंबर काढण्यासाठी धावाधाव करायची, मग पुन्हा एक्सरे किंवा इतर तपासण्या असतील तर त्यासाठी पुन्हा अगोदर अंगठे , नोंदणी करायचे, तेथून पुन्हा स्लॅब किंवा इतर काही असतील, इंजेक्शन असतील तर अगोदर नोंदणी आणि मग पुढची प्रक्रिया, नाव नोंदणी, एमएलसी अशा साऱ्या गोष्टी एकाच ठिकाणी करता येणे शक्य असतानाही रुग्ण किंवा त्याच्या सोबतच्यांना वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला लावण्यात किमान अर्धा तास जातो असे चित्र सध्या जिल्हा रुग्णालयात अनुभवावे लागत आहे. रुग्णाला आंतररुग्ण म्हणून दाखल करायचे असेल तरी यातील अनेक हेलपाटे करावेच लागतात, यामुळे उपचार मिळेल तेव्हा मिळेल, मात्र प्रक्रियेतच जीव नकोस होत असल्याचे चित्र सध्या जिल्हा रुग्णालयात आहे.
 
 
खाजगी एजंटांचा घेरा : पोटभरे 
बीडच्या जिल्हा रुग्णालयात वडवणी तालुक्यातील एका महिलेच्या शास्त्रक्रिये दरम्यान गौज तसेच पोटात राहिल्याने मोठा गोंधळ झालेला असतानाच आता या प्रकरणात बहुजन विकास मोर्चाचे बाबुराव पोटभरे यांनी देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. बीड जिल्हा रुग्णालयात दाखल रुग्णांना खाजगीमध्ये पळविणारे मोठे रॅकेट कार्यरत असून सारे रुग्णालयच अशा खाजगी दलालांच्या घेऱ्यात असल्याचा आरोप बाबुराव पोटभरे यांनी केला आहे.
 
 
प्रयोगशाळांच्या निदानात देखील तफावत
जिल्हा रुग्णालयात रक्त , लघवी आदींच्या तपासण्या केल्या जातात , मात्र अशा तपासण्यांचे अहवाल मनमानीपणे टाकले जातात का काय असा संशय यावा अशी परिस्थिती आहे. जिल्हा रुग्णालयातील रुग्णाचा रक्ताच्या तपासणीचा अहवाल आणि त्याचवेळी खाजगी प्रयोगशाळेतून केलेल्या तपासणीचा अहवाल यात मोठा फरक येत असल्याची काही उदाहरणे समोर आली आहेत. हे सारे का होत आहे असाही प्रश्न आहेच.
 
 
 

Advertisement

Advertisement