Advertisement

४८ तासात घरफोडी उघड 

प्रजापत्र | Thursday, 30/07/2026
बातमी शेअर करा

बीड दि.३० (प्रतिनिधी): केज पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडीच्या गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उघड करत एका आरोपीस अटक केली असून त्याच्याकडून २ लाख ८१ हजार रुपये रोख रक्कम व ७४ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने, असा एकूण ३ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
   

 केज पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून करण्यात येत होता. दि. २९ जुलै रोजी पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने यांचे पथक केज परिसरात आरोपीचा शोध घेत असताना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार ऋषिकेश दिलीप काळे (रा. फुलेनगर, ता. केज, जि. बीड) याला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान आरोपीने घरफोडीचा गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच चोरी केलेली रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने घरात लपवून ठेवल्याची माहिती दिली. त्यानुसार पंचांसमक्ष आरोपीच्या ताब्यातून २ लाख ८१ हजार रुपये रोख रक्कम आणि ७४ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ३ लाख ५५ हजार रुपये असून पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपीला केज पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, सहाय्यक पोलीस अधीक्षक व्यंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने, पोलीस हवालदार बप्पासाहेब घोडके, दिलीप गित्ते, महेश जोगदंड, जफर पठाण तसेच चालक गणेश मराडे यांनी पार पाडली.
 

Advertisement

Advertisement