बीड दि.२६(प्रतिनिधी): स्विफ्ट कारमधून शेळ्यांची चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश करत तीन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट कार, रोख रक्कम असा एकूण ४ लाख ८५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या टोळीने सहा गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.
वडवणी पोलीस ठाणे येथे दाखल असलेल्या शेळी चोरीच्या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा करत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सुभाष किसन विटकर, बेग रफीक बेग रशीद आणि इमरान चाँद शेख यांना बीड शहरातील खंडेश्वरी देवी मंदिरासमोरील मैदानातून स्विफ्ट कारसह ताब्यात घेण्यात आले.चौकशीत आरोपींनी स्विफ्ट कारमधून दिवसा आणि रात्री विविध भागांत जाऊन शेळ्यांची चोरी केल्याची कबुली दिली. काही दिवसांपूर्वी स्विफ्ट कारमध्ये शेळ्या भरून नेतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत टोळीला जेरबंद केले.आरोपींनी वडवणी, नेकणूर, धारूर आणि तलवडा पोलीस ठाण्यांमध्ये नोंद असलेल्या एकूण सहा शेळी चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली असून पुढील तपासासाठी वडवणी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

बातमी शेअर करा
