Advertisement

खत घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्याचा अपघाती मृत्यु

प्रजापत्र | Thursday, 23/07/2026
बातमी शेअर करा

  केज दि.२३(प्रतिनिधी): खत घेऊन जाण्यासाठी केज येथे आलेल्या तरुणाची दुचाकी स्लिप होऊन तो खडी भरुन चाललेल्या हायवाच्या मागील चाका खाली आल्याने घडलेल्या अपघातात तरुण शेतकऱ्याचा चिरडून जागीच मृत्यु झाल्याची घटना आज गुरुवार (दि.२३) रोजी सकाळी घडली.

    नितीन आदीनाथ चाटे (वय ३५) रा. तांबवा ता. केज हे आज गुरुवारी सकाळी खत घेऊन जाण्यासाठी केज येथे आले होते. यावेळी त्यांच्या पुढेच धारुर कडून खडी घेऊन येणारा हायवा क्रमांक एम.एच. ४४ यू ९९७१ पुढे चालत होता. या हायवाच्या मागे मयत नितीन चाटे आपली दुचाकी क्रमांक जी.ए. ०३ एए ८१२८ वर चालले होते. दरम्यान केज शहरातील भवानी चौकात दोन्ही वाहने आली असता दुचाकीस्वार हायवाला ओव्हरटेक करुन पुढे जाण्याचा प्रयत्न करताना दुचाकी अचानक स्लीप झाली अन् दुचाकीस्वार हायवाच्या मागील चाकाखाली आल्याने त्याचा चिरडून जागीच मृत्यु झाला. हा अपघात इतका भीषण होता की, मयाताचे शरीर पूर्ण छिन्नविछिन्न झाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला आहे.  

Advertisement

Advertisement