गेवराई दि.२०(प्रतिनिधी): उसने घेतलेल्या पैशांच्या वादातून पोटच्या मुलाने बापावर चाकूने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना गौंडगाव येथे घडली आहे. मजूरी करणाऱ्या एका कुटुंबातील अंतर्गत वादाचे रूपांतर हत्येमध्ये झाले.
गेवराई तालुक्यातील गौंडगाव येथील मन्नाबी ईसाक शेख यांनी दिलेल्या तक्रारीनुसार,त्यांचे पती ईसाक शेख यांनी मोठा मुलगा शौकत शेख याच्याकडून लहान मुलाच्या लग्नासाठी १,००,००० रुपये उसने घेतले होते. त्यापैकी ३०,००० रुपये परत केले होते, मात्र उर्वरित पैशांसाठी शौकत हा नेहमी वाद घालत असे. रविवार (दि.१२) रोजी सकाळी ८ च्या सुमारास दारूच्या नशेत आलेल्या शौकतने पैशांचा तगादा लावत पती ईसाक शेख यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि खिशातील चाकूने त्यांच्या डाव्या छातीत वार केला.या जीवघेण्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या ईसाक शेख यांना तातडीने गेवराई रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. मात्र, तब्येत बिघडल्याने शनिवार (दि.१८) रोजी बीडच्या रुग्णालयात नेले असता लिफ्टमध्येच बेशुद्ध झाले. त्यानंतर डॉक्टरांनी तपासून त्यांना मयत घोषित केले.या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात रविवार (दि.१९)रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोउनि अप्पासाहेब रोकडे या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.

बातमी शेअर करा
