माजलगाव दि.१४(प्रतिनिधी): तालुक्यातील सादोळा येथील दोन शेतकऱ्यांनी पांदण रस्त्याच्या मागणीसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला.मात्र पोलिसांच्या प्रसंगावधान राखून शेतकऱ्यांना रोखल्याने मोठा अनर्थ टळला.
सादोळा येथील गट क्रमांक १७० मधून जाणारा पांदण रस्त्यावरील अतिक्रमण हटवून रस्ता खुला करण्याची मागणी किशोर एरंडे आणि भागवत एरंडे यांनी प्रशासनाकडे केली होती. तसेच भूमिअभिलेखाच्या नकाशात रस्ता असतानाही चुकीचा पंचनामा करून रस्ता खुला करण्यास नकार दिल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष झाल्याने आज मंगळवारी (दि.१४) सकाळी उपविभागीय अधिकारी माजलगाव कार्यालय समोर एका शेतकऱ्याने अंगावर डिझेल ओतून घेतले तर दुसऱ्याने विषारी औषध प्राशन करण्याचा प्रयत्न केला. मात्र,पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत दोघांनाही ताब्यात घेतल्याने मोठी दुर्घटना टळली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

बातमी शेअर करा
