मुंबई : राज्यात बहुतांश भागात जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलैच्या सुरुवातीलाच अनेक भागात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे राज्यवासियांना काहीसा दिलासा मिळत असून काही जिल्ह्यांमध्ये शेतीच्या कामांना वेग प्राप्त झाला आहे . दरम्यान, उत्तर कोकणातील काही भागात शनिवारी सकाळपासून अतिवृष्टीसदृश्य पावसाची नोंद होत असून मध्य महाराष्ट्रातील घाट विभागात पावसाचा जोर अधिक आहे. राज्यातील अनेक भागात मंगळवारपर्यंत पावसाचा जोर राहण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाकडून राज्यातील काही भागांना शनिवारी ‘रेड’ तर काही भागांना ‘ऑरेंज’ अलर्ट देण्यात आला आहे.
यंदा जूनच्या शेवटच्या आठवड्यात मान्सूनने संपूर्ण राज्य व्यापले होते. मात्र, त्यानंतरही राज्यात सर्वदूर पावसाचा अभाव होता. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात होती. दरम्यान, मागील काही दिवसांपासून अनेक भागात दमदार पाऊस नोंदला जात आहे. राज्याच्या किनारपट्टीपासून ते कर्नाटक किनारपट्टीपर्यंत समुद्रसपाटीवर ऑफ-शोअर ट्रफ म्हणजेच कमी दाबाचा लांब पट्टा तयार झाला असून तो संपूर्ण आठवडाभर कायम राहण्याची शक्यता आहे. तसेच वायव्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून पुढील दोन दिवसांत ते आणखी तीव्र होण्याचा अंदाज आहे. दरम्यान, ४ ते ७ जुलैदरम्यान कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात अनेक ठिकाणी पावसाची तीव्रता वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
राज्यात आज पावसाचा अधिक प्रभाव कुठे ?
उत्तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज असून काही भागात अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तर दक्षिण कोकणातही पावसाचा जोर कायम राहणार आहे. मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात वादळी वाऱ्यांसह तसेच विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. तर विदर्भातील काही भागातही मुसळधार तर काही भागात मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
‘रेड’ आणि ‘ऑरेंज’ अलर्ट कुठे?
सातारा घाट विभाग, रायगड, पुणे घाट विभाग, मुंबई, ठाणे, पालघर आणि नाशिक घाट विभाग आदी भागांना ‘रेड अलर्ट’, तर कोल्हापूर घाट विभाग, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, नाशिक, धुळे, नंदुरबार, वाशिम, यवतमाळ आणि गोंदिया आदी भागांना ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे.
आज ‘यलो अलर्ट’ कुठे?
अहिल्यानगर, बीड, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली आदी भागांत ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.

