बीड दि. २६ (प्रतिनिधी): बीड जिल्ह्यातील वाळू घोटाळ्यात अडकल्यानंतर राजकीय दबावातून फौजदारी कारवाईतून वाचलेल्या आणि सध्या सक्तीच्या रजेवर असलेल्या गेवराई तहसीलदार संदीप खोमणेवर आता त्याच्या स्वतःच्या गावातील प्रकरणातून गुन्हा झाला आहे. पुणे ग्रामीणच्या हद्दीतील माळेगाव पोलीस ठाण्यात संदीप केशव खोमणेच्या विरोधात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीडच्या गेवराई येथील तहसीलदार संदीप खोमणे सातत्याने वादग्रस्त राहिलेला आहे. गेवराई तालुक्यातील कोट्यावधींच्या वाळू घोटाळ्यात चौकशी समितीने संदीप खोमणेच्या विरोधात स्पष्टपणे ठपका ठेवलेला असतानाही बीड जिल्ह्यात त्याच्यावर फौजदारी कारवाई झाली नाही. जिल्हा प्रशासनाने त्याच्या निलंबनाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. त्यालाही आता आठवडा उलटला असला तरी त्यावर कारवाई झालेली नाही. यामागे मोठ्याप्रमाणावर राजकीय दबाव असून मंत्री दत्ता भरणेंचे खोमणेला पाठबळ असल्याचे सर्रास बोलले जाते.
बीड जिल्ह्यातील प्रकरणात संदीप खोमणेला संरक्षण मिळालेले असले तरी त्याच्याच मूळ गावात संदीप खोमणे अडकला आहे. एक वर्षांपूर्वीच्या एका प्रकरणात संदीप खोमणेवर मालेगाव पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल झाला आहे. गावातील एका व्यक्तीला गावच्या व्हाट्सअप ग्रुपवर जातीवाचक बोलल्यामुळे हा गुन्हा दाखल झाला आहे. तेथेही वर्षभर या प्रकरणात कारवाई झाली नव्हती, मात्र अखेर न्यायालयाच्या आदेशाने हा गुन्हा दाखल झाल्याचे सांगितले जाते. संदीप खोमणेसह गावातील इतरांविरुद्ध देखील गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या संदर्भाने अनुसुचूची जातीच्या आरक्षणावरून व्हाट्सअप ग्रुपवर आक्षेपार्ह टिपण्णी करण्यात आली होती. मागच्या एक वर्षांपासून सदर प्रकरणातील फिर्यादी न्यायालयीन लढाई लढत होते. त्यात अखेर यश आले असून संदीप केशव खोमणेच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

