धाराशिव - गेल्या चार दिवसांपासून खासदार ओमराजे निंबाळकर हे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष सोडून शिवसेना शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चांनी जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. या चर्चांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उबाठा) जिल्हा प्रवक्ते तानाजी जाधवर यांनी फेसबुकवरून केलेली भावनिक पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
"ओम दादा जाऊ नका! विनंती आहे. मला डीपीचा फोटो काढायची वेळ आणू नका," असे भावनिक आवाहन जाधवर यांनी आपल्या फेसबुक पोस्टमधून केले आहे. या एका वाक्याने राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले असून ओमराजे निंबाळकर यांच्या संभाव्य पक्षांतराच्या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे.
धाराशिव जिल्ह्यात शिवसेना (उबाठा) पक्षाचे प्रमुख चेहरे म्हणून ओमराजे निंबाळकर यांची ओळख आहे. पक्ष संघटना, कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनतेमध्ये त्यांचा मोठा जनसंपर्क असल्याने त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशा परिस्थितीत पक्षातीलच एका पदाधिकाऱ्याने सोशल मीडियावरून केलेली भावनिक साद अनेक प्रश्न उपस्थित करत आहे.
दरम्यान, ओमराजे निंबाळकर यांच्या पक्षांतराबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. जाधवर यांच्या पोस्टनंतर सोशल मीडियावर समर्थक आणि कार्यकर्त्यांकडून विविध प्रतिक्रिया उमटत असून अनेकांनी ओमराजे यांनी ठाकरे गटातच राहावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
राजकीय निरीक्षकांच्या मते, महाराष्ट्रातील बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यातील घडामोडींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. ओमराजे निंबाळकर यांच्या पुढील राजकीय भूमिकेकडे आता जिल्ह्यासह राज्याच्या राजकारणाचे लक्ष लागले आहे.
सध्या तरी तानाजी जाधवर यांची भावनिक फेसबुक पोस्ट आणि ओमराजे निंबाळकर यांच्या पक्षांतराच्या चर्चा हा जिल्ह्यातील राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे.

