Advertisement

शंभर कोटीसाठी पक्षांतराचा विचार असेल तर, किडन्या विकून शंभर कोटी गोळा करू

प्रजापत्र | Sunday, 21/06/2026
बातमी शेअर करा

धाराशिव दि.२१ (प्रतिनिधी) : जर शंभर कोटीसाठी पक्षांतराचा विचार केला जात असेल तर, प्रसंगी आमच्या किडन्या विकून तुम्हाला शंभर कोटी रुपये गोळा करून देऊ; पण तुम्ही ठाकरेंची साथ सोडू नका, अशी शब्दात उमरगा आणि लोहार तालुक्यातील शिवसैनिकांनी पत्र लिहून खा.राजेनिंबाळकर यांना साद घातली आहे. खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या संभाव्य पक्षांतराच्या चर्चांना उधाण आले असताना उमरगा-लोहारा तालुक्यातील पदाधिकारी व शिवसैनिकांनी त्यांना भावनिक पत्र लिहून पक्षाशी निष्ठा कायम ठेवण्याच आवाहन केले आहे.

     शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख सुधाकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या या निवेदनात, मागील चार दशकांपासून शिवसेनेच्या विचारांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या भावना मांडण्यात आल्या आहेत. पक्षांतराच्या चर्चांमुळे सामान्य शिवसैनिक अस्वस्थ झाल्याचे नमूद करत, राजेनिंबाळकर यांनी कोणताही निर्णय घेताना कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घ्याव्यात, अशी विनंती करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की, धाराशिव लोकसभा मतदारसंघातील जनतेने आणि महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांनी मोठ्या विश्वासाने राजेनिंबाळकर यांना निवडून दिले आहे. त्यामुळे पक्षांतराचा निर्णय हा लाखो मतदारांच्या विश्वासाला धक्का देणारा ठरू शकतो. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्या कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस मेहनत घेऊन त्यांना विजय मिळवून दिल्याची आठवणही पत्रात करून देण्यात आली.दरम्यान, खासदारांच्या पक्षांतरासाठी कथितरीत्या ‘ऑपरेशन टायगर’ राबविले जात असल्याच्या चर्चांचाही निवेदनात उल्लेख आहे. या संदर्भात कार्यकर्त्यांनी उपरोधिक भाषेत प्रतिक्रिया देताना, जर शंभर कोटी रुपयांच्या आमिषामुळे पक्षांतराचा विचार होत असेल, तर आम्ही शिवसैनिक आमच्या किडन्या विकूनही तेवढी रक्कम उभी करू; मात्र तुम्ही ठाकरे कुटुंबाची साथ सोडू नका, असे म्हटले आहे. कार्यकर्त्यांनी पुढे नमूद केले आहे की, राजेनिंबाळकर हे शिवसेना परिवारातील संघर्षशील आणि जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होणारे नेतृत्व आहे. कठीण काळात पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या नेतृत्वाबद्दल शिवसैनिकांच्या मनात विशेष आदर असून, पक्षांतराच्या चर्चांमुळे हजारो कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या जात आहेत.निवेदनात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीचाही पत्रात उल्लेख करण्यात आला आहे. सध्याच्या परिस्थितीत त्यांना मानसिक त्रास होईल असे कोणतेही पाऊल उचलू नये, अशी अपेक्षाही या पत्रात व्यक्त करत बाळासाहेब ठाकरे यांनी व्यक्त केलेल्या विचारांशी आणि ठाकरे कुटुंबाशी निष्ठावान राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उमरगा-लोहारा तालुक्यातील अनेक पदाधिकारी आणि शिवसैनिकांच्या स्वाक्षऱ्यांसह हे निवेदन खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना त्यांच्या मेलवर पाठवण्यात आले आहे, राजेनिंबाळकर यांच्या पुढील राजकीय भूमिकेकडे आता कार्यकर्त्यांसह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Advertisement

Advertisement