लातूर : लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील बोंबळी येथील शेतकरी काशिनाथ गायकवाड यांना मदत म्हणून सरकारने उपलब्ध करून दिलेला बैल हा आजारी असल्याने सरकारवर विविध स्तरातून टीकेची झोड उडाली. या घटनेची तातडीने दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘काशिनाथ गायकवाड यांना बाजारात नेणून त्यांना आवडेल तो बैल घेऊन द्या’, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ.भारत बास्टेवाड यांना शुक्रवारी (ता. १२) दिल्या. त्यामुळे गायकवाड यांना लवकरच नवा बैल उपलब्ध होणार आहे.
शेतकरी काशिनाथ गायकवाड यांचा एक बैल वीज कोसळून मृत्युमुखी पडला. त्यानंतर एका बैलाच्या जागी पत्नी हौसाबाई यांना औताला जुंपून गायकवाड हे शेतीची म शागत करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ही घटना पाहून राज्यभरातून हळहळ व्यक्त करण्यात आली. या घटनेची सरकारने दखल घेत पशुसंवर्धन विभागाने १० जून रोजी तातडीने मदत म्हणून त्या शेतकऱ्याला एक बैल उपलब्ध करून दिला. मात्र, मदतीसाठी दिलेला हा बैल शेतातील मशागतीदरम्यान खाली बसला.तो आजारी असल्याचेही निष्पन्न झाले. या घटनेचाही व्हीडिओ आता तितकाच व्हायरला झाला आहे. शेतकऱ्याला मदत मिळण्याऐवजी शेतकऱ्याला बैलाच्या उपचाराचा खर्च करावा लागत आहे. प्रशासनाने मदतीच्या नावाखाली आजारी बैल शेतकऱ्याला सोपवून फसवणूक केल्याची टीका सरकारवर आणि प्रशासनावर सुरू झाली आहे.दरम्यान, मुंबई येथे भारतीय जनता पक्षाची पत्रकार परिषद शुक्रवारी (दि. १२) आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत लातूरच्या शेतकऱ्याला दिलेला बैल आजारी निघाला. त्यामुळे शेतकऱ्याची फसवणूक झाली, अशी चर्चा सुरू आहे, असा प्रश्न फडणवीस यांना विचारण्यात आला.यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, चार दिवसांपूर्वी लातूरमधून अतिशय मन हेलावून टाकणारी बातमी आपल्या वाचायला मिळाली. लातूर जिल्ह्यातील एक भूमिहिन शेतकरी इतरांच्या शेतात जाऊन मशागत करतात. बटईने शेती करतात. त्यांचा बैल दगावल्याने एका बैलाच्या जागी पत्नीला औताला जुंपून ते मशागत करत होते. हे आपल्याला पहायला मिळाले. म्हणून मृत बैलाची नुकसान भरपाई देण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने दिली. शिवाय, मदतीसाठी एक बैलही दिला. पण, दिलेला बैल योग्य नसल्याचे दिसून आले. त्यामुळे आता संबंधीत शेतकऱ्याला घेऊन बाजारात जा आणि त्यांना आवडेल तो बैल घेऊन द्या, अशा सुचना मी जिल्हाधिकाऱ्यांना आज दिल्या आहेत.

