Advertisement

चाकूचा धाक दाखवत महिलांचे दागिने,रोख रक्कम लंपास

प्रजापत्र | Monday, 08/06/2026
बातमी शेअर करा

बीड दि.८ (प्रतिनिधी):धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात तिघांनी चाकूचा धाक दाखवत महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने व रोख रक्कम जबरीने हिसकावून नेल्याची घटना सोमवारी पहाटे घडली असून एकूण १ लाख ६९ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  अधिक मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि.८) पहाटे सुमारे ५.२५ च्या दरम्यान आहेरवडगाव शिवारात धुळे-सोलापूर रोडवर ही घटना घडली. फिर्यादी राहुल उद्धवराव पोहेकर (वय ३०, व्यवसाय-व्यापार, रा. नवीन मोंढा, जालना) हे आपल्या कुटुंबीयांसह क्रेटा कार (एमएच २१ सीजी ०४००) मधून प्रवास करत असताना अज्ञात तीन इसमांनी त्यांना अडविले.यावेळी आरोपींनी चाकूचा धाक दाखवून फिर्यादीची पत्नी, आई व मावशी यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने तसेच पर्समधील रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या दरोड्यात फिर्यादीच्या पत्नीच्या अंगावरील सुमारे ४२ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व ४५ हजार रुपये रोख, मावशीच्या अंगावरील अंदाजे ३१ हजार ५०० रुपयांचे दागिने तसेच आईच्या अंगावरील सुमारे ५० हजार ७५० रुपयांचे सोन्याचे दागिने असा एकूण १ लाख ६९ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे.या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच प्रभारी अधिकारी सपोनि श्री.दराडे यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास पोउपनि कुकलारे यांच्याकडे सोपविण्यात आला असून आरोपींचा शोध सुरु आहे.

Advertisement

Advertisement