बीड दि.६(प्रतिनिधी):पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत यांनी एकमेव सहाय्यक पोलीस निरीक्षक असलेल्या मंगेश साळवे यांना दुबार नियुक्ती दिल्याने मर्जीतील अधिकाऱ्यांना ठाणेदाराची लॉटरी लागल्याच्या चर्चा सुरु असताना आता नेकनूर पोलीस ठाण्यातील एका कर्मचाऱ्याला १० हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडले आहे. त्यामुळे एसपी यांनी मर्जीतील अधिकाऱ्यांना नियुक्ती दिली पण आता लाचेच्या कारवाईमुळे तरी या लाडक्या अधिकाऱ्याला इतर अधिकाऱ्यांप्रमाणे नियंत्रण कक्षाची वाट घटकप्रमुख दाखवणार आहेत का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
नेकनूरला चंद्रकांत गोसावी यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या जागी मंगेश साळवे यांना लॉटरी लागली होती.अंभोरा इथे कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांना पुन्हा नेकनूरसारखे ठाणे देऊन एसपी यांनी त्यांचा गौरवच केला होता.जिल्ह्यातील एकाही सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना दुबार प्रभारी पद दिले नसताना साळवे हे एसपींचे लाडके अधिकारी असल्यामुळे त्यांना वेगळे नियम बदल्यामध्ये लागू झाले होते अश्या चर्चा सुरु होत्या.दरम्यान शनिवारी दुपारी जालन्याच्या एसीबीला लाचेची तक्रार मिळाल्यानंतर एका प्रकरणात दहा हजार रुपये स्वीकारताना दत्तात्रय बळवंत यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. जिल्ह्यात एकीकडे एसपी लाचखोरांच्या विरोधात असल्याचा डंका वाजवत असताना अन दुसरीकडे मात्र त्यांचे लाडके अधिकारीच लाच घेण्यासाठी प्रोत्साहन तर देत नाहीत ना असं प्रश्न आता नेकनूरकरांना या कारवाईमुळे पडत आहे.लाच घेताना कर्मचारी पकडला तर प्रभारी अधिकाऱ्यांना नियंत्रण कक्षाचा रस्ता दाखवणे अपेक्षित असते पण एसपी इथेही लाडक्या अधिकाऱ्याला पाठिशी घालणार का हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.

बातमी शेअर करा
