Advertisement

एसटी बसेसच्या वक्तशीरपणासाठी कडक उपाययोजना

प्रजापत्र | Tuesday, 02/06/2026
बातमी शेअर करा

   मुंबई दि.२(प्रतिनिधी): राज्यातील लाखो प्रवाशांची जीवनवाहिनी असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसेस वेळेवर आणि नियमित धावाव्यात यासाठी कडक उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. यासंदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली.महामंडळात बसेसच्या वेळेच्या नियोजनासाठी ‘इशू अँड स्टार्ट’ ही कार्यपद्धती लागू असून, त्यानुसार प्रत्येक बस नियोजित सुटण्याच्या वेळेच्या किमान दहा मिनिटे आधी फलाटावर उभी असणे आवश्यक आहे. तसेच बस सुटण्यापूर्वी वाहकाने किमान पाच प्रवाशांची तिकिटे निर्गमित करणे अपेक्षित आहे. या प्रक्रियेमुळे बसच्या वक्तशीरपणाचे अचूक मूल्यमापन करता येते.
     बैठकीत सरनाईक यांनी सांगितले की, एखादी बस वेळेवर सुटल्यास तिच्या पुढील सर्व फेऱ्याही नियोजनानुसार पार पडतात. त्यामुळे प्रवाशांचा एसटीवरील विश्वास वाढतो आणि प्रवासी संख्येतही वाढ होते. विशेषतः पहाटे ५ ते सकाळी १० या कालावधीत सुटणाऱ्या सर्व बसफेऱ्या शंभर टक्के वेळेवर आणि नियमित राहाव्यात यासाठी विभागीय नियंत्रक, आगार व्यवस्थापक, वाहतूक निरीक्षक आणि संबंधित अधिकाऱ्यांनी विशेष दक्षता घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.सकाळच्या सत्रातील अनेक बसफेऱ्या चालक किंवा वाहक वेळेवर हजर न राहिल्यामुळे उशिरा सुटत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे यापुढे बसेसच्या वक्तशीरपणावर नियंत्रण ठेवण्यासाठी बसस्थानकांवरील सीसीटीव्ही यंत्रणा, वाहकांचे अहवाल आणि डिजिटल नोंदींचा वापर करण्यात येणार आहे.बसेस वेळेवर सुटल्या अथवा उशिरा सुटल्या याची नियमित पडताळणी करण्यात येणार असून, ज्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे बस उशिरा सुटल्याचे आढळेल त्यांच्यावर त्याच दिवशी जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही परिवहन मंत्र्यांनी दिला.एसटी सेवेची विश्वासार्हता वाढविण्यासाठी आणि प्रवाशांना दर्जेदार सेवा देण्यासाठी वक्तशीरपणालाच सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असून, सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जबाबदारीची जाणीव ठेवून काम करावे, असे आवाहनही प्रताप सरनाईक यांनी केले.

 

 

Advertisement

Advertisement