बीड दि.१९(प्रतिनिधी):शहरातील सुभाष रोडवरील श्री साई मोबाईल शॉपी अज्ञात चोरट्यांनी फोडल्याची घटना शनिवार (दि.१८) रोजी मध्यरात्री घडली आहे.आतमध्ये प्रवेश करत विविध नामांकित कंपन्यांचे ३० ते ३५ लाखांचे मोबाईल लंपास केले असून अज्ञात चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात
कैद झाला आहे.
बीड शहरातील सुभाष रोडवर सचिन रासणे यांच्या मालकीचे श्री साई मोबाईलचे दुकान आहे. आज पहाटे दुकानात चोरी झाल्याचे उघडकीस आले आहे. अज्ञात चोरट्याने शटरच्या सेंटर लॉकची फरशी तोडली, त्यानंतर शटर उचकटून आतमध्ये प्रवेश करत दुकानात ठेवलेले विविध नामांकित कंपन्यांचे तब्बल ३० ते ३५ लाखांचे मोबाईल एका पिशवीमध्ये भरत लंपास केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसुन येत आहे. शहर पोलीसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असुन श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. या प्रकरणी दुपारी उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान सुभाष रोड सारख्या वर्दळीच्या रस्त्यावर ऐन अक्षय तृतीयेच्या दिवशीच चोरीची मोठी घटना घडल्याने व्यापाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाला आहे.

बातमी शेअर करा
