Advertisement

अवघ्या दोन दिवसात ट्रॅक्टरसह चोर पकडला 

प्रजापत्र | Saturday, 18/04/2026
बातमी शेअर करा

केज दि.१८ प्रतिनिधी): तालुक्यातील कानडी माळी येथून बुधवार (दि.१५) रोजी चोरीस गेलेल्या ट्रॅक्टर व ट्रॉली प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या दोन दिवसांत छडा लावत आरोपीला अटक केली आहे.
      केज तालुक्यातील कानडी माळी येथील सतीश सुदाम बनसोडे यांनी त्यांच्या घरासमोर उभे असलेले ट्रॅक्टर व ट्रॉली बुधवार (दि.१५) रोजी चोरीस गेल्याची तक्रार केज पोलीस ठाण्यात दिली होती. त्यावरून गुन्हा र.नं. 212/2026 कलम 303(2) बी.एन.एस. अन्वये नोंद करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून सुरू होता. तपासादरम्यान घटनास्थळाच्या परिसरातील ४० पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेजची पाहणी व तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. त्यातून आरोपीची ओळख पटली. आरोपी आपल्या घरी आल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर शुक्रवार (दि.१७) रोजी रात्री ९ च्या सुमारास पायतळवाडी ता. माजलगाव येथे सापळा रचून रामदास आसाराम श्रीराम (वय २५ ) यास ताब्यात घेण्यात आले.चौकशीदरम्यान आरोपीने चोरीची कबुली दिली असून चोरीस गेलेले ट्रॅक्टर शेतात लपवून ठेवल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तेथून ट्रॅक्टर व ट्रॉली असा एकूण सुमारे ५ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीसह जप्त माल पुढील तपासासाठी केज पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.सदरील कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके,पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली   उपनिरीक्षक महेश विघ्ने, पो.ह.जफर पठाण,बप्पासाहेब घोडके, दिलीप गिते, विकी सुरवसे, गणेश मराडे आणि विकास राठोड यांनी केली.

Advertisement

Advertisement