Advertisement

बीडमध्ये एसीबीचा डबल धमाका

प्रजापत्र | Wednesday, 08/04/2026
बातमी शेअर करा

बीड-वारसा हक्क प्रमाणपत्र काढण्यासाठी ३९ हजारांची मागणी करून तडजोडीअंती ३५ हजार देण्याचे ठरल्यानंतर यातील ९ हजार रुपये घेताना दहिफळ वडमाऊलीच्या तलाठ्याला रंगेहात पकडण्यात आले. तलाठी कार्यालयाच्या बाहेरच हा सापळा रचण्यात आला होता. तर दुसरी कारवाई ग्रामसेवकावर करण्यात आली असून पाचशे रुपयांची लाच घेताना त्यालाही एसीबीने ताब्यात घेतले आहे. एकाच दिवशी लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या डबल धमक्यामुळे लाचखोरांमध्ये खळबळ उडाली होती.

    लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने बुधवारी महसूलमधील दोन जणांना लाच घेताना पकडल्यामुळे खळबळ उडाली आहे. पहिली कारवाई केज तालुक्यातील दहिफळ वडमाऊली येथील तलाठीवर करण्यात आली. वारसा हक्क प्रमाणपत्रासाठी थेट ३९ हजारांची मागणी केल्यानंतर त्यात तडजोड करून ३५ हजार ठरले. आणि यातील ९ हजार रुपये स्वीकारताना परमेश्वर जाधवला एसीबीने रंगेहात पकडले. ही कारवाई डीवायएसपी सोपान चित्तमपल्ले, बीडकर, सुरवसे, पुरी यांच्या टीमने केली.

तर दुसरी कारवाई पिंपळगाव गाडे (ता. परळी) चा अतिरिक्त पदभार असलेल्या दशरथ देविदास गोरेवर करण्यात आली आहे. जलसिंचन विहिरीत १ हजाराची मागणी करून त्यातील ५०० रुपये घेताना आरोपी ग्रामसेवकाला ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई समाधान कवडे, शेळके, गवळी, काळे, मेहत्रे यांच्या वतीने करण्यात आली. दरम्यान एकाच दिवसांत दोन बडे मासे एसीबीच्या गळाला लागल्याने महसूल विभागात खळबळ उडाली होती.

Advertisement

Advertisement