पुणे : काँग्रेसने निवडणूक लढवली तर महाराष्ट्र तुम्हाला सोडणार नाही. तुमचा आत्तापर्यंतचा कुठं नाही झाला तेवढा मोठा पराभव बारामतीत होईल असा इशारा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. बारामतीत आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यासाठी सुरु असलेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात ते बोलत होते.
बावनकुळे म्हणाले, सर्वांच्या हृदयात आणि हृदयावर अजित दादांनी राज्य केलं. आज ही त्यांची आठवण पावला पावलावर आहे. महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी सुनेत्रा ताई यांची ताकद आहे. सुनेत्रा ताई यांनी विधिमंडळ आणि मंत्रिमंडळात छाप पाडला आहे. देवेंद्रजी यांनी सांगितलं आहे की, आपल्याला निर्णय करायचा आहे की बारामतीमध्ये सर्वाधिक मतांनी विजय होईल. मला अभिमान वाटतो की. मंत्रिमंडळात मी अजित दादांच्या शेजारी बसायचो. सुनेत्रा ताई दादांच्या सावली होत्या आणि आज त्या बारामतीच्या माऊली आहेत. काँग्रेसला विनंती आहे. त्यांना आम्ही संदेश दिला आहे की, महाराष्ट्राचे संस्कार जपले पाहिजे, राजकारण राजकारणाच्या जागेवर करायचं असतं. काँग्रेसने निवडणूक लढवू नये ही जनभावना आहे. अजित पवारांचा जो जीवन प्रवास राहिला आहे तो सगळा प्रवास काँग्रेस सोबत राहिला आहे. बारामती मध्ये काँग्रेस पक्षाने निवडणूक लढवू नये ही विनंती आहे. सुनेत्रा पवारांच्या पाठीमागे त्यांनी उभं राहावं. अजितदादांची जी जागा आहे ती वेगळी आहे. काँग्रेस पक्षाने अजित दादांचा विचार करावा. अजित दादांचा जीवन हे काँग्रेस पक्षाच्या सहवासात अनेक वर्ष गेला. काँग्रेस पक्षाला संस्कार आणि संस्कृती राहिली नसेल तर त्यांनी लढावं. माझी हात जोडून विनंती आहे की त्यांनी लढू नये.

