बीड दि.३० (प्रतिनिधी):-पारगाव-सोलापूर हायवे बायपासवर एका अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या भीषण धडकेत एका ४२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यु झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकीस्वार जागीच ठार झाला असून, धडक दिल्यानंतर अज्ञात वाहन चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमर अकबर नाईकवाडे (वय ४२ ), राहणार डोकेवाडी ता. भूम, जि. धाराशिव हातोला येथून आपल्या गावाकडे म्हणजेच डोकेवाडीकडे जात होते. पारगाव-सोलापूर हायवे बायपासवर त्यांच्या दुचाकीला एका भरधाव अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. धडक लागताच अमर नाईकवाडे हे रस्त्यावर फेकले गेले आणि त्यांच्या डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत झाली. धडक इतकी जोरदार होती की त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताचाफायदा घेऊन अज्ञात वाहन चालक आपले वाहन घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाला.घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह तातडीने बीड जिल्हा रुग्णालय येथे हलवण्यात आला. त्या ठिकाणी शवविच्छेदन करण्यात आले असून, नाईकवाडे यांच्या निधनामुळे डोकेवाडी गावावर शोककळा पसरली आहे.

बातमी शेअर करा
