माजलगाव दि.२७(प्रतिनिधी):अवैध गुटखा वाहतुकीच्या विरोधात माजलगाव शहर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून पोलिसांनी एका स्विफ्ट डिझायर कारसह सुमारे ६ लाख ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
माजलगाव शहर पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती की, एका कारमधून अवैध गुटख्याची वाहतूक केली जात आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयास्पद असणारी स्विफ्ट डिझायर कार (क्रमांक MH 14 BR 5229) अडवून तिची झडती घेतली असता डायरेक्टर कंपनीचा गुटखा अंदाजे किंमत १,६२,००० रुपये.,शॉट कंपनीची सुगंधित तंबाखू किंमत ८१,००० रुपये, स्विफ्ट कार: किंमत ४,००,००० रुपये असा एकूण ६,४३,००० हजारांचा मुद्देमाल आज (दि.२७) रोजी जप्त केला असून नवीद अन्वर शेख रा. पात्रुड, ता. माजलगाव याला जागीच अटक केली आहे. त्याच्यासोबत असलेले अन्य दोन आरोपी फरार झाले असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या तिघांविरुद्ध माजलगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरील कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली माजलगाव शहरचे पोलीस निरीक्षक राहुल सुर्यतळ, पोलीस उपनिरीक्षक संदीप राठोड,गणेश तळेकर, अस्लम शेख, महादेव बहिरवाळ, अंगद घोडके व सुनील गवळी यांनी केली आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप राठोड हे करत आहेत.

