माजलगाव दि.२१(प्रतिनिधी): मोरेश्वर हॉटेलसमोर उभ्या असलेल्या कारमधून अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा १ लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना शुक्रवार (दि.२०) रोजी घडली असून अज्ञात चोरट्याविरुद्ध माजलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुमन खंडू झेटे (वय ६०), रा.मोगरा, ता.माजलगाव या शुक्रवार (दि.२०) रोजी पतीसह बँकेतून पैसे काढण्यासाठी माजलगाव येथे आल्या होत्या. त्यांनी एसबीआय बँकेतील आपल्या खात्यातून १ लाख रुपये काढले आणि ते पिशवीमध्ये ठेवले. त्यानंतर त्यांनी ही पिशवी त्यांच्या कारमध्ये ठेवली. मोगरा गावाकडे परत जात असताना दुपारी १.२० च्या सुमारास त्यांनी आपली कार परभणी चौकातील मोरेश्वर हॉटेलसमोर थांबवली.कारचा चालक बाथरुमसाठी गेला होता, तर सुमन झेटे यांचे पती आणि नातेवाईक चहा पिण्यासाठी हॉटेलमध्ये गेले होते. पतीनी चहासाठी बोलावल्याने सुमन झेटे देखील काही मिनिटांसाठी कारमधून खाली उतरून हॉटेलमध्ये गेल्या. अवघ्या दहा मिनिटांत सर्वजण चहा पिऊन परत आले असता, कारच्या सीट कव्हरमध्ये ठेवलेली १ लाख रुपयांची पिशवी गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. अज्ञात चोरट्याने कारमध्ये कोणीही नसल्याची संधी साधून ही चोरी केली.भरदिवसा वर्दळीच्या ठिकाणी झालेल्या या चोरीमुळे नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.या प्रकरणाचा अधिक तपास श्री.बलवंते करत आहेत.

