Advertisement

बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला

प्रजापत्र | Saturday, 24/01/2026
बातमी शेअर करा

बीड दि.२४ (प्रतिनिधी):बीड शहराजवळील बिंदुसरा प्रकल्प परिसरात आज सकाळी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मागील तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका २३ वर्षीय तरुणाचा मृतदेह धरणाच्या पाण्यात आढळून आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. 

     संकेत तुकाराम नवले (वय २३) रा.पाली ता.बीड असं मृत तरुणाचं नाव असून या घटनेमुळे पाली गावावर मोठी शोककळा पसरली आहे. संकेत नवले हा दोन दिवसांपूर्वी आपल्या घरातून बाहेर पडला होता. मात्र, रात्र झाली तरी तो घरी परतला नाही. कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला, नातेवाईकांकडे विचारपूस केली, परंतु त्याचा कुठेही पत्ता लागला नाही. संकेतचा शोध घेत असताना बिंदुसरा धरणाच्या काठावर त्याचे कपडे आणि चप्पल आढळून आली होती. यामुळे काहीतरी अघटीत घडल्याची शक्यता ग्रामस्थांनी आणि कुटुंबीयांनी व्यक्त केली होती. त्या दृष्टीने गावकऱ्यांनी आणि प्रशासनाने परिसरात शोधमोहीम तीव्र केली. स्थानिक तरुणांनी आणि प्रशासकीय यंत्रणेने पाण्यात शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र कालपर्यंत यश आले नव्हते. अखेर आज शनिवारी सकाळी संकेतचा मृतदेह तलावाच्या पाण्यात तरंगताना आढळून आला.घटनेची माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह पाण्याबाहेर काढून पंचनामा केला आहे. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बीड येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला असून पुढील तपास बीड ग्रामीण पोलीस करत आहेत.

Advertisement

Advertisement