Advertisement

 मुरुमाची वाहतूक करणारे चार हायवा जप्त

प्रजापत्र | Sunday, 22/06/2025
बातमी शेअर करा

बीड दि.२२ (प्रतिनिधी): मागच्या काही दिवसांपासून बीड (Beed)जिल्ह्यात वाळू आणि मुरूम माफीयांनी धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे.या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी कठोर कारवाईच्या सूचना केल्यानंतर पोलिसांनी माफीयांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली. गोदापात्रात स्थानिक गुन्हे शाखा आणि चकलांबा पोलिसांनी वाळूमाफियांवर कारवाया सुरू केल्या असताना आता दुसरीकडे ग्रामीण (Gramin police)पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळराजे दराडे यांनी चार हायवांना ताब्यात घेण्याची मोठी कारवाई केली आहे. या हायवामधून मुरुमाची चोरट्या मार्गाने विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पाठलाग करून ही मोठी कारवाई केली. या कारवाईत साधारण एक ते दीड कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती आहे.ग्रामीण पोलीस ठाण्यात या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे कळते.
         सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळराजे दराडे यांनी  यापूर्वीही जिल्ह्यात मोठमोठ्या कारवाया केल्या आहेत. गुटखा माफिया,वाळू माफिया, हवाला रॅकेट, फटाक्याची गोडाऊन, पत्त्याचे क्लब उध्वस्त करत खाकीची दहशत त्यांनी निर्माण केली होती. काल रात्री उशिरा त्यांना (Beed)शहरातील जिओ पेट्रोल पंपाजवळ हायवामधून मुरुमाची वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत सापळा रचला.यावेळी पोलिसांना पाहताच हायवा चालकांनी तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला असता  बाळराजे दराडेंनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी पाठलाग करून सर्व हायवा ताब्यात घेतले. एक दोन नव्हे तर तब्बल चार हायवा आणि तेही एकाच वेळी पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे या कारवाईचे जिल्ह्यातून कौतुक होत आहे. या कारवाईत साधारण एक ते दीड कोटींचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे. ग्रामीण पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येत आहे. ही कारवाई  पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सय्यद पोलीस निरीक्षक बाळराजे दराडे, श्री मोराळे, नामदेव सानप,चालक पवार, राठोड यांनी केली.

 

चार आरोपीही ताब्यात

ग्रामीण पोलिसांनी केलेल्या कारवाईत चार हायवा आणि चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.एम. एच. १६ सीसी ७१३५,एमएच २३ एयु.१७४१,एम. एच. २३ एयु.२७८५ व एमएच. २३ बीएल.०१११ हे चार हायवा आणि संजय सुरेश चितळकर (वय-३०,रा. बागपिंपळगाव),अक्रम अयुब पठाण (वय-३०, रा.चांदीदली, मुंबई),सतीश नामदेव सौंदरमल (वय-३७, रा. बागपिंपळगाव), ऋषिकेश रणजीत केंगार (वय-२३, रा. मुर्शदपुर) या चार चालकांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Advertisement

Advertisement