बीड दि.१(प्रतिनिधी)- पुणे येथून ढेकणमोहा ता. बीड येथे वडिलांच्या अंत्यविधीसाठी येत असतांना मुलासह सुनेच्या कारला भरधाव टेम्पोने जोराची धडक दिली. या अपघातात पती जागीच ठार झाला असून पत्नी गंभीररित्या जखमी झाल्याची घटना काल (दि.३१)शनिवार रोजी सायंकाळी पाथर्डी - शिरूर रोडवर मानुर ता. शिरूरकासार जि. बीड शिवारात घडली.
ढेकणमोहा येथील संतोष मदन थापडे (वय ४०) हे पुण्यातील वाघोली येथे स्थायिक झाले होते. (दि.३१) मे रोजी त्यांचे वडिल मदन आश्रुबा थापडे (वय ७०) रा. ढेकणमोहा यांचे निधन झाल्याने संतोष थापडे व त्यांची पत्नी निता थापडे हे दोघे कार
क्र.एम.एच.१४.जी.डी.३१७५ मधुन काल सायंकाळी अहमदनगर-पाथर्डी मार्गे बीड ढेकणमोहाकडे येत होते. त्याचवेळी समोरून येणाऱ्या आयशर मालगाडी क्र.एम.एच.४६.ई. २०९७ ने त्यांच्या कारला जोराची धडक दिली. या अपघातात संतोष मदन थापडे (वय ४०) यांचा मृत्यु झाला तर निता थापडे या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मयत संतोष थापडे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी बीड जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आला . दरम्यान वडिलांच्या अंत्यविधीसाठी येत असतांना काळाने मुलावर झडप घातल्याने एकाच कुटूंबातील बाप-लेकांचा मृत्यु झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.